जुलै २०२३ मध्ये अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ४१ आमदारही आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर २०२४ च्या मे महिन्यात महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) विरुद्ध सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष असा सामना पार पडला. यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या. त्यानंतर काही दिवसांनी अजित पवारांनी त्यांची चूक मान्य केली. तसंच बारामतीतून निवडूक लढवणार नसल्याचंही जाहीर केलं. आता मात्र अजित पवारच बारामतीतून लढतील हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं आहे. बारामतीतून अजित पवार (Ajit Pawar) हेच उमेदवार असतील असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
सुप्रिया सुळेंबाबत चूक झाल्याचं अजित पवारांनी केलं मान्य
सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या आहेत. तसंच अजित पवारांच्या ( Ajit Pawar ) त्या बहीण आहेत. सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं करुन आपण चूक केली. हे व्हायला नको होतं असं अजित पवारांनी एका मुलाखतीत मान्य केलं होतं. त्यानंतर अजित पवार हे आता बारामती लढणार नाहीत अशा चर्चाही रंगल्या, तसंच त्यांच्याकडूनही हे सांगण्यात आलं. मात्र आज प्रफुल्ल पटेल यांनी हे जाहीर केलं की बारामतीतून अजित पवारच ( Ajit Pawar ) उमेदवार असतील.
हे पण वाचा- उमेदवारांच्या पोकळीमुळे ‘पलीकडे’ इच्छुकांना निमंत्रण – अजित पवार
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
अजित पवार ( Ajit Pawar ) बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार. मी अधिकृतपणे हे तुम्हाला सांगतो आहे. कुठलाही संभ्रम कुणीही ठेवू नये. ही जागा मी अधिकृतरित्या घोषित करतो आहे. बारामतीत दुसरं तिसरं कुणीही उभं राहणार नाही. अजित पवारच बारामतीचे उमेदवार असतील असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष असल्याने मला हा अधिकार आहे. त्यामुळे मी जाहीर करतो आहे. असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.
बारामतीतले कार्यकर्तेही आग्रही
प्रफुल्ल पटेल यांनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर आता अजित पवारच बारामतीतून लढणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामतीतून अजित पवारांनीच लढलं पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यासाठी बारामतीत आज आंदोलनही झाल्याचं पाहण्यास मिळालं. यानंतर आता बारामतीत नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल. बारामती हा महाराष्ट्रात ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यातला हाय व्होल्टेज मतदार संघ होता. आता विधानसभेला आमदारकीच्या निवडणुकीसाठी अजित पवार ( Ajit Pawar ) उभे राहिले तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कुणाला उभं करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.