अजित पवार मुख्यमंत्री होणारच नाहीत, असं चॅलेंज राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. तसंच, मंत्रीपदाची शपथ घेतलेले नऊही आमदार पुन्हा शरद पवारांकडे परततील असा दावाही त्यांनी केला होता. यावर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार आहेत. २०२४ नंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात समन्वय होईल. जागा वाटप या समन्वयाने होईल. त्यानंतर जो काही निकाल येईल, त्यानंतर केंद्रीय संसदीय मंडळ जो निर्णय घेईल त्यानुसार आम्ही पुढे जाऊ”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“५१ टक्के लोक मोदींच्या बाजूला आहेत. अजित दादांनी चांगला निर्णय घेतला. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. अजित दादांनी आतापर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयापेक्षा हा निर्णय चांगला घेतला की ते मोदींसोबत आले. जीवनात मुख्यमंत्री होतील की नाही हे अंतिम नसतं, पण हे खरं आहे की अजित दादांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >> अजित पवार मुख्यमंत्री होणार? छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “मी चॅलेंज देतो की…”

विमान चालवण्याचं काम संजय राऊतांकडे

“उद्धव ठाकरेंनी विमान चालवण्याचं काम संजय राऊतांकडे दिलं. संजय राऊत हे पायलट आहेत. पायलटच्या मनात आलं विमान पाडायचं तर प्रवाशाला कोण वाचवणार? प्रवासी तर जाणारच आहेत. ज्यादिवशी पायलटचं काम संजय राऊतांकडे दिलं तेव्हाच प्रवासी उतरून गेले, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

“देवेंद्र फडणवीसांसारख्या अष्टपैलू नेतृत्त्वाबद्दल, ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्यांनी महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या मनात जी उंची गाठलीय, ती उंची कधीच कमी होऊ शकणार नाही. उद्धव ठाकरेनांही ही संधी मिळाली होती. परंतु, त्यांनी ज्या पद्धतीने अडीच वर्षे सरकार चालवलं, देवेंद्र यांच्यासारखी उंची ते गाठू शकले नाहीत. त्यामुळे गलिच्छ भाषेत देवेंद्र फडणवीसांवर टीका करून राहिलेली उंचीही कमी करत आहेत. उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर इतक्या विचित्र परिस्थितीत आले आहेत की सभेतून अशा पद्धतीने टीका करत आहेत, याचं उत्तर जनता देईल”, असं बावनकुळे म्हणाले.

…मुंबईत मोठा उद्रेक होईल

“१३ कोटी जनतेच्या मनात देवेंद्र फडणवीसांबद्दल आदर आहे. जितका अपमान कराल तितकं त्यांचं नेतृत्त्व मोठं होत जातं. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना भावासारखं सांभाळलं. उद्धव ठाकरेंना रोज माणसं सोडून जात आहेत. बावचळलेल्या आणि उद्ध्वस्त मनस्थिती ठाकरे आले आहेत. याविरोधात इतका मोठा उद्रेक होईल की मुंबईत याचे पडसाद उमटतील. ते आम्ही रोखू शकणार नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar will not become chief minister bjps reaction to sambhaji rajes statement sgk