सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण केली आहे. संबंधित आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानंतर अद्याप विधानसभा अध्यक्षांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. येत्या काही दिवसांत विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेतील आणि शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं मला मुळीच वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दलवाई यांनी दिली. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना मिळालेल्या जामिनावरही भाष्य केलं.
हेही वाचा- “…तर आम्ही कधीही सहन करणार नाही”, शरद पवार-अजित पवार भेटीवरून नाना पटोलेंचा सूचक इशारा
नवाब मलिक ईडी कोठडीतून बाहेर आले आहेत. ते कोणत्या पवारांकडे जातील? या प्रश्नावर हुसेन दलवाई म्हणाले की, ते मी सांगू शकत नाही. नवाब मलिक बाहेर आले, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना इतके दिवस तुरुंगात का ठेवलं होतं? हेच मला कळत नाही आणि आता बाहेर येण्यासाठी नेमकी काय जादू झाली? हेही समजत नाही, अशी प्रतिक्रिया दलवाई यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “…तर आम्ही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवू”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल काय लागेल? अजित पवार मुख्यमंत्री होतील का? यावर हुसेन दलवाई म्हणाले, “निकाल लागेल असं तुम्हाला वाटतं का? माझ्या मते निकाल लागणारच नाही. आणखी काही दिवस असेच ढकलले जातील. काहीही निकाल लागला तरी सरकारवर काहीही परिणाम होईल, असं मला वाटत नाही. ते निकाल अशाप्रकारे लावतील की, कुणाचंही सदस्यत्व रद्द होणार नाही. हे सरकार ढकलून-ढकलून चालवलं जाईल.”
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या चर्चेवर हुसेन दलवाई पुढे म्हणाले, “ते अजित पवारांना कसं काय मुख्यमंत्री करतील? अजित पवारांना ते मुख्यमंत्री करतील, असं मला मला मुळीच वाटत नाही.”