Sharad Pawar birthday: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज(सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी भाषण करत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावेळी भाषण केले. याप्रसंगी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना टोला लगावल्याचे दिसून आले.
अजित पवार म्हणाले, “प्रत्येक नेत्याने आपल्या स्वत:च्या जिल्ह्यातून स्वत:बरोबर, काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करा. आपण राज्यात पहिल्या क्रमांकावर जाऊ. मी बोलतोय त्याला अपवाद, नाशिक, पुणे आणि काहीप्रमाणात बीड जिल्हा आहे. परंतु इतर जेव्हा एवढं चांगलं मार्गदर्शन सगळ्यांना करतात, पण तुमच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय अन्य कोणी निवडूनच येत नाही. मी आज शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त कोणाची बिनपाण्याची करण्याचं ठरवलं नव्हतं, पण खरंय ते बोललं पाहिजे. मी शेवटी खरं बोलणारा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख आहे, त्याला मी तरी काय करू?”
याशिवाय, “आपण मार्गदर्शन करा, मीही मार्गदर्शन जेव्हा करत असतो त्यावेळेस माझ्या पुणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त ताकद राष्ट्रवादील कशी मिळेल, यासाठी दिलीप वळसे पाटील आणि आम्ही सगळे जीवाचं रान करतो. तशाच पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त एक शपथ घ्या, की आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही मतभेद असतील ते सगळे संपवून टाकायचे. मग भले त्यामध्ये एखाद्या नेत्याला दोन पावलं माग यावं लागलं तरी चालेल, काही बिघडत नाही.” असंही अजित पवार म्हणाले.
याचबरोबर, “शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या नंतर नेहमी बेरजेचं राजकारण केलं आहे. हे बेरजेचं राजकारण करत असताना आपल्याला आपला पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर न्यायचा म्हटला तर. कुठंतरी काहीतरी आपल्या पक्षात आपल्या घरात, काय थोडं पुढं मागं करावा लागणार आहे, याची खूणगाठ आजच्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व बोलणाऱ्या नेत्यांनी आणि इतर जे बोलू शकले नाहीत, अशा पण बांधावी.” असं आवाहनही यावेळी अजित पवारांनी केलं.
याशिवाय, “ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आमदारकी आणि खासदारकी या सगळ्या निवडणुकीत आपल्या विचारांची माणसे कशी निवडून येतील, यासाठी आज सर्वांनी निश्चय करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो.” असं शेवटी अजित पवार म्हणाले.