राज्यात २३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारपेक्षा अधिक जागा तसेच तीन हजार पोटनिवडणुका अशा एकूण सुमारे २५ हजार जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला राज्यभर सुरुवात झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करून आल्यानंतर मातोश्रींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.
“अजित पवार आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले”, असं आशाताई पवार म्हणाल्या.
हेही वाचा >> ग्रामपंचायतींच्या २५ हजार जागांसाठी आज निवडणूक; राजकीय नेत्यांना ताकदीचा अंदाज येण्यास मदत
“अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच (माझ्या हयातीत) मुलाने मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, आता पाहुयात”, असंही त्या पुढे म्हणाल्या.
आज २३५३ ग्रामपंचायतींसाठी मतदान
राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. त्याची नक्की आकडेवारी उपलब्ध नव्हती. पण २३५३ ग्रामपंचायतींमध्ये एकूण २०,५७२ जागा आहेत. या सर्व २३५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक होत आहे. याशिवाय २०६८ ग्रामपंचायतींमधील रिक्त २९५० जागांसाठी पोटनिवडणूक आजच होणार आहे. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदासाठीही पोटनिवडणूक होत आहे. अशा पद्धतीने सुमारे २५ हजार जागांसाठी रविवारी मतदान होईल. नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सोमवारी होईल. तर नक्षलग्रस्त भागांमध्ये मंगळवारी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा >> प्रकाश सोळंकेंनी घेतली जरांगे-पाटलांची भेट, चूक केली मान्य; दोघांत काय झाला संवाद? वाचा…
- निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती : २३५३
- एकूण जागा : २०,५७२
- सरपंचपदे : २३५३
- पोटनिवडणुका : ३०८०
- संरपंच पोटनिवडणूक : १३०