शरद पवार यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी याबाबतचा सुचक इशाराही दिला आहे. प्रसार माध्यमांनी अजित पवार यांना पार्थच्या राजकारनातील प्रवेशावर प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं.

‘पार्थ राजकारणात येतो का आपल्याला माहित नाही, पण लोकशाही आहे, लोक काय म्हणतात ते पाहू.’ असे म्हणत अजित पवार यांनी मुलाच्या राजकारणातील प्रवेशावर सुचक वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु पत्रकारांनी अजित पवार यांना याबाबत विचारले असता, मुलं आता मोठी झाली आहेत. ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसची सहा आणि सात ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक आहे. या बैठकीत स्थानिकांचं आणि प्रदेशाध्यक्षांचं म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ऐकून घेणार आहेत. त्यानंतर निर्णय होईल, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर पार्थच्या राजकारातील प्रवेशावर चर्चा सुरू झाली आहे. मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात पार्थ निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.