दुष्काळग्रस्तांविषयी अत्यंत शेलक्या शब्दांत मुक्ताफळे उधळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना जोरदार समाचार घेतला. पवारांना दुष्काळग्रस्तांचे शिवांबू पाजले पाहिजे, असा सणसणीत टोला ठाकरे यांनी हाणला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना थोडीसुद्धा लाज वाटत असेल, तर त्यांनी अजित पवारांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडय़ातील जनतेला दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त गावांना पाण्याच्या टाक्यांचे, जनावरांना चारावाटप ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. दुष्काळग्रस्तांसाठी ही मदत फूल ना फुलाची पाकळी असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे जाहीर सभेत अजित पवार यांनी खालच्या पातळीवर उतरत दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडविली. तो धागा पकडून पत्रकारांनी विचारले असता संतप्त होत ठाकरे म्हणाले की, राज्यात दुष्काळ असताना असे वक्तव्य करून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पवारांनी केले आहे. मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांचे शिवामृत त्यांना पाजा, असा टोला लगावला. या बरोबरच पवार यांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली.
राज्याचा उपमुख्यमंत्रीच असे काही बोलत असेल, तर सर्वानी मिळून अजित पवारांना शिवांबू पाजावे. दुष्काळग्रस्तांचे हे शिवांबू असल्याचे सांगावे, असे ठाकरे म्हणाले.
शरद पवारांना मला काही सांगायचं आहे, शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून जी प्रतिमा तुम्ही तयार केली आहे, ती खरी की खोटी मला माहीत नाही. पण तुमचा पुतण्या भारनियमनातही हे अकलेचे दिवे लावत आहे, हे तुम्हाला मान्य आहे काय? शरद पवार, मुख्यमंत्री यांना थोडी लाज वाटत असेल, तर त्यांनी अजित पवारांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, किशनचंद तनवाणी व आर. एम. वाणी, तसेच महापौर कला ओझा, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व नरेंद्र त्रिवेदी आदी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्तांना शिवसेनेची मदत
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनेच्या मदतीतून उपलब्ध केलेले २५ टँकर, प्लास्टिकच्या ३०० टाक्या, जनावरांसाठी २० मालमोटारी चारा व १० मालमोटारी अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. लाभार्थीना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता पक्षाने स्वत:हून दुष्काळग्रस्तांना मदत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. खासदार चंद्रकांत खैरे व राजकुमार धूत, आमदार रवींद्र वायकर, एकनाथ शिंदे व ठाण्यातील शिवसेना आमदार, आमदार मीरा रेंगे, माजी आमदार हरिभाऊ लहाने व सेलूचे उपनगराध्यक्ष संदीप लहाने यांच्यामार्फत ही मदत उपलब्ध केल्याचे सांगण्यात आले.