Ajit Pawar Iftar Party: काही दिवसांपासून मुघल शासक औरंगजेबाची कबर आणि नागपूर येथे उसळलेली दंगल यामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. राज्यात दोन गटात तणावाची पार्श्वभूमी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करत मुस्लीम समुदायाशी संवाद साधला. मुस्लीम समुदायाला धमकविण्याचा किंवा जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.
मुंबईत आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत मुस्लीम समुदायाला रमजानच्या शुभेच्छा देत असताना अजित पवार म्हणाले, “भारत हा विविधतेत एकतेचे प्रतिक असलेला देश आहे. विभाजनवादी शक्तींच्या जाळ्यात कुणीही अडकू नये.”
मुस्लीम समुदायाला विश्वास देताना अजित पवार म्हणाले की, तुमचा बंधू म्हणून मी तुमच्या पाठिशी उभा आहे. जर कुणी मुस्लीम बांधव आणि भगिनींना त्रास देण्याचा किंवा त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडले जाणार नाही.
“आपण होळीचा सण एकत्र साजरा केला. आता गुढीपाडवा आणि ईदही एकत्र साजरा करू. हे सर्व सण आपल्याला एकत्र राहण्याचाच संदेश देतात. आपण सण एकत्र साजरे करतो कारण एकता ही आपली शक्ती आहे. मुस्लीम समुदायाच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे”, असेही अजित पवार म्हणाले.
रमजान हा सण केवळ मुस्लीम समुदायापुरता मर्यादित नाही. रमजानने मानवतेचा संदेश दिला असून त्याग आणि स्वयंशिस्तीचे धडे यातून मिळतात. या पवित्र महिन्यात वंचितांचे दुःख काय आहेत, हे समजते. रमजानच्या महिन्यात शरीर आणि मनाचीही शुद्धता होते, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुघल शासक औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली कबर वादात आहे. हिंदू संघटनांकडून सदर कबर नष्ट करण्याची मागणी होत आहे. तर नागपूर येथे या विषयावरून दंगलही उसळली होती. या दंगलीत अनेक वाहने, घरांचे नुकसान झाले. तर पोलिसांसह काही नागरिक जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सदर परिसरात दोन दिवस कर्फ्यू लावण्यात आला होता.
दंगली प्रकरणी पोलिसांनी शंभरहून अधिक लोकांना अटक केली आहे. सदर दंगलीचे पडसाद महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटलेले आहेत. सत्ताधारी बाकांवरून औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा वापरली जात असताना महायुतीमधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष मात्र वेगळी भूमिका घेताना दिसत आहे. राज्यात धार्मिक तेढ पसरविणारे विधाने कोणत्याही नेत्याने करू नयते, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.