Suresh Dhas Parabhani Sabha : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, सोमनाथ सूर्यवंशीप्रकरणी योग्य कारवाई करावी, या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणं केली. भाजपा आमदार सुरेश धस यांनीही आजची सभा गाजवली. धनंजय मुंडेंसह त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला. तसंच, उपस्थित असलेल्या आमदार राजेश विटेकर यांनाही त्यांच्याकडे असलेली माहिती उघड करण्याची विनंती केली.
सुरेश धस म्हणाले, “जगात जर्मनी आणि देशात परभणी असं या परभणीचं नाव आहे. मी या परभणीचा १८ महिने पालकमंत्री राहिलो आहे. परभणी किती रगेल आहे, परभणीची रग मला चांगली माहितेय. या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास शिकणाऱ्या मुलाला कोबिंग ऑपरेशनमध्ये नेलं आणि त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला. विजय वाकोडे यांचाही मृत्यू झालाय. कोबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर केली. तर विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना ५ लाख जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमनथच्या कुटुंबीयांना वेळ देणार आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनाही वेळ देणार आहेत.”
हेही वाचा >> Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
…तर आकाच्या आकाचाही नंबर लागू शकतो
“अशोक गोरबांड नावाचा पीआय स्वतःला एसपी समजतो. अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो, जिथे जातो तिथे उद्योग करतो. ते निलंबित न होता त्यांना सक्तीची निवृत्ती दिली पाहिजे. त्यांची चौकशी झाली पाहिजे. स्वर्गीय संतोषच्या बाबतीतही मागणी केली होती की आयजी लेव्हलच्या अधिपत्याखाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे. ती मागणी मान्य केली. हे लोक पोलिसांकडून सुटणार तर नाहीच, पण चुकून सुटले तरी ते न्यायालयीन चौकशीत अडकले पाहिजेत. त्यांना मोकोका लागला पाहिजे. पोलिसांनी मकोकामध्ये घातला की नमस्ते लंडन. पुन्हा हे माघारी येत नाहीत. आका तर गेलाच पाहिजे. जर आकाने यंटो बंटो केला असेल तर आकाच्या आकाचाही नंबर लागू शकतो. माणसं मारायची लफडी यांची आहेतच”, असं म्हणत सुरेश धसांनी आजची सभा गाजवली.
सौ चुहे खाके बिल्ली हज को चली
“संतोष देशमुख हत्येचा व्हिडिओ आकाला दाखवला असेल, आकाच्या आकाने पाहिला असेल तर ‘करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी.’ पण आज मी त्याबाबतीत बोलत नाही. ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’, तसं आकाचे आका आले आणि म्हणाले, ‘जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या.’ पण आधी नीट वागायचं असतं हे कोणी सांगायचं? आणि ‘अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…?’ संदीप दिगुळेपासून संतोष देशमुखापर्यंत हत्येची बेरीज केली तर त्याचा मास्टरमाईंड कोण, कोणी हे उद्योग केले हे तुम्हाला माहीत नसेल तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीची माणसं पाठवा. इतर समाजाला काय वागणूक मिळते, अठरा पगड जातीला काय वागणूक मिळते?”, असंही ते म्हणाले.
“२००-५०० कुटुंबे शहर सोडून चालले. काही गंगाखेड्यात चालले. गंगाखेडचे भाऊजी का नाही आले? रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठे अडकले माहीत नाहीत. डबल पॉलिसी हाणता की काय? इथे आमच्याही सोबत आणि तिकडे त्यांच्यासोबत. पण रत्नाकर भाऊजी हे वागणं बरोबर नव्हं. खुल्लम खुल्ला आलं पाहिजे”, असं आवाहन त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांना केलं.
ते पुढे म्हणाले, “मी अजितदादांना बोललो होतो, आमच्या पक्षाकडून संधी मिळत नाही तर प्रकाश सोळंकेला पालकमंत्री करा. नाहीतर राजेश विटेकरला करा. हे नसेल जमत तर बुलढाण्याचे कायंदे आमदार आहेत, त्यांना करा. ते तर घड्याळाकडून जिंकून आले आहेत. तुमचं घड्याळ नसतं आलं. आम्हीही आलो नसतो. पण मागे बसलेले विभुती आहेत, त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण इथे आहोत. नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सर्वांचा.”
“मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. बिनमंत्र्यांचा राहुदेत आमचा जिल्हा. नाहीतर लोकं क्या हुआ तेरा वादावर येणार आहेत”, असंही ते म्हणाले.