Jitendra Awhad : “आमदारकीचा राजीनामा द्या, आपण…”, जितेंद्र आव्हाडांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं खुलं आव्हान
Jitendra Awhad On Assembly Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. तसेच महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. त्याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. मात्र, असं असलं तरी विधानसभेच्या निकालाबाबत आता अनेक नेत्यांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड या मुद्द्यावर सातत्याने भाष्य करत आहेत.
आव्हाड यांनी विरोधी पक्षांच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरुद्ध जन आंदोलन उभारणार असल्याचे देखील म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाडांना खुले आव्हान दिले आहे. ईव्हीएम हॅक होतं असं वाटत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, आपण मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊ असे परांजपे म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणूक निकालांवर संशय घेतला जात असल्याबद्दल बोलताना परांजपे म्हणाले की, “लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राज्यातील जनता मविआच्या मागे मजबुतीने उभी आहे, असा टाहो सर्वच नेते फोडत आहेत. लोकसभेला मिळालेले यश महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळाले, अशाप्रकारची यशोगाथा सांगत फिरत होते. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला जे अभूतपूर्व यश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वाखाली मिळालं ते नाकारण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. लोकसभेला यश मिळालं तर ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळलं आणि विधानसभेत महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं असा रडीचा डाव सध्या चालू आहे” असे आनंद परांजपे यावेळी म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांना खुले आव्हान
ईव्हीएम हॅक झाल्याच्या आरोपावर आनंद परांजपे म्हणाले की, “माझं खुलं आव्हान सो कॉल्ड डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे, त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर राज्यातील पहिली निवडणूक मुंब्रा कळवा विधानसभेत घेऊया. ज्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल”.
हेही वाचा >> एकनाथ शिंदेंचं महायुतीच्या बैठकीनंतर सूचक वक्तव्य, “मी काळजीवाहू मुख्यमंत्री, आता…”
ठाकरेंच्या शिवसेनेने आत्मचिंतन करावे…
राज्याच्या राजकारणात ‘मातोश्री’ आणि शरद पवारांना एकटं पाडणं हा सुनियोजित कट आहे, असा आरोप होत असल्याबद्दल विचारले असता परांजपे म्हणाले की, “लोकशाहीत जनतेने दिलेला कौल मान्य करायचा असतो. राज्यातील जनतेने २३५ पेक्षा जास्त जागा निवडून देताना महायुतीवर विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाबरोबर युती केली तेव्हाच शिवसेनेचा मतदार दूर होत चालला होता. शिवसेनेला त्याचा अंदाज आला नाही. लोकसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आले. २०१९ विधानसभा निवडणुकीत अखंड असलेल्या शिवसेनेचे महायुतीमध्ये ५६ आमदार निवडून आले होते. त्यापेक्षाही अभूतपूर्व यश शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मिळाले. त्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आत्मचिंतन करावं”.
“ज्या अजित पवारांनी गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्याचं काम महाराष्ट्रात केलं, त्यांच्या नेतृत्वावर अन्याय केल्याने वेगळी राजकीय भूमिका अजित पवारांना घ्यावी लागली, तेव्हा महाराष्ट्रातील जनता त्यांच्या निर्णयाच्या बाजूने उभी राहिली. शरद पवारांना स्पष्ट दाखवून दिले की त्यांचा खरा वारसदार, पक्षाचा खरा नेता अजित पवार हेच आहेत”, असा दावा देखील परांजपे यांनी यावेळी केला.