लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमाड: वेटलिफ्टिंगसारख्या खेळात मनमाडची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात येऊ लागली असून अल्बेनियातील दुर्रेस येथे सुरू असलेल्या जागतिक युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारे हिने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी करीत ४५ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली आहे.

जगभरातील विविध १२ देशांच्या खेळाडूंमध्ये या स्पर्धेत चुरशीची लढत झाली. आकांक्षाने स्नॅचच्या आपल्या तिसर्या प्रयत्नांत ६८ किलो वजन उचलले तर, क्लिन जर्कमध्ये ८२ किलो वजन उचलले. एकूण १५० किलो वजन उचलून सलग तिसर्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देण्याची किमया साधली. आकांक्षाला अल्बेनिया येथे भारतीय वेटलिफ्टिंग संघाची प्रमुख म्हणून उपस्थित असलेली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर आणि छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रविण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

आकांक्षा ही येथील गुरू गोविंदसिंग विद्यालयात इयत्ता १० वीत शिकत आहे. इयत्ता १० वी परीक्षेच्या वेळीच युवा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा आल्याने परीक्षा द्यावी की, स्पर्धेत भाग घ्यावा, अशा दोलायमान स्थितीत असतांना तिने अखेर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. आपला हा निर्णय किती योग्य होता, हे तिनेच पदक मिळवून दाखवून दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akanksha vyavhare won bronze medal in youth weightlifting competition mrj
Show comments