एमआयएम पक्षाचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी आज(गुरुवार) औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारीस पठाण यांची उपस्थिती होती. यानंतर त्यांनी एक सभा घेतली व या सभेत बोलताना त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं दिसून आलं.
ओवेसींनी म्हटलं, “ मी कोणालाही उत्तर द्यायला आलेलो नाही. मी कोणाला वाईट म्हणायला आलेलो नाही, गरजच नाही. तुमची लायकीच नाही की मी तुम्हाला उत्तर देऊ. अरे माझा तर एक खासदार आहे, तू तर बेघर आहेस तुला काय उत्तर देऊ. तू तर बेपत्ता आहेस, तुला काय उत्तर देऊ. तूला तर घरातून काढलं होतं तुला मी काय उत्तर देऊ. मात्र, उत्तर देखील नक्की देईन, येईन एकदिवस पुन्हा आमखास मैदानावर. खूप लवकरच येईन. अकबरुद्दीन ओवेसी लढेल आपल्या आवडीच्या ठिकाणी आपल्या आवडीच्या वेळेवर लढेल. तुमच्या आवडीच्या ठिकाणावर नाही. मी वेळ ठरवणार, जागा मी ठरवणार.”
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी घेतलं औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन
तसेच यावेळी ओवेसी उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, “तुम्ही घाबरला आहात का? आज या देशात द्वेष पसरवला जात आहे. पण अकबरुद्दीन ओवेसी द्वेषाला द्वेषाने उत्तर देणार नाही तर प्रेमाने उत्तर देईन. या सर्व परिस्थितीमुळे तुम्ही घाबरला आहात का? घाबरलं पण नाही पाहिजे. आज जर कोणाला वाटत असेल की तो आम्हाला घाबरवेन आणि आम्ही घाबरू. नाही आम्ही घाबरणार नाही. तुम्हाला कोणाला उत्तर देण्याची गरज नाही, त्यासाठी आम्ही आहोत. घाबरू नका, निर्धास्त रहा. द्वेष करणाऱ्यांनी ४० टक्के मतं घेतली परंतु ते विसरले की ६० टक्के मत अद्यापही आमच्यासोबतच आहेत. जो भी कुत्ता जैसा भी भोकता है, भौकने दो…, कुत्तौ का काम भौकना है, शेरो काम खामोश चला जाना है. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. ते जाळं विणत आहेत तुम्हाला अडकवण्याठी, तुम्ही अडकू नका जे बोलायचंय बोलू द्या, हसून निघून जा.”
महाराष्ट्राच्या मुस्लिमांना कधी विसरणार नाही –
याचबरोबर, “तुम्हाला किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही मुस्लिमास अकबर ओवेसी कधी विसरणार नाही. मग तो औरंगाबादचा माझा मुस्लीम बांधव असेल किंवा मग मुंबई, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेडचा माझा मुस्लीम बांधव असेल. प्रत्येक तरूण, वृद्धासह माझ्या माता-भगिनींनी ज्यांनी आम्हाला साथ दिली त्यांना कधी ओवेसी कधीच विसरला नव्हता, विसरलेला नाही आणि विसरणारही नाही.” असंही भाषणाच्या सुरुवातीला बोलताना ओवेसी म्हणाले होते.