राज्य नाटय़ स्पर्धा असो वा महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा असो; कोणत्याही नाटय़ महोत्सव वा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कलावंतांना गरज असते, एका चांगल्या संहितेची. रंगकर्मीची ही अडचण लक्षात घेत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने राज्यात ठिकठिकाणी ‘स्क्रिप्ट बँक’ अर्थात संहिता बँक उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संहिता डिजिटल स्वरूपात रूपांतरित करत नाटय़ परिषदेच्या ‘वेब पोर्टल’मध्ये समाविष्ट करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. नाटय़ संमेलनानंतर लवकरच हा उपक्रम रंगकर्मीना खुला होणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने नवोदित, हौशी रंगकर्मीसाठी नाटय़ अभिवाचन, नाटय़ शिबिरे असे उपक्रम राबविले जातात. आजच्या नव्या पिढीपर्यंत ही कला पोहचावी यासाठी परिषद प्रयत्नशील आहे. ‘गांव तिथे शाखा’ या उक्तीनुसार परिषदेची पाळेमुळे विस्तारत असताना कार्यकारिणीने रंगकर्मीच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कुठलेही नाटक रंगभूमीवर सशक्त उभे रहावे यासाठी नेपथ्य, दिग्दर्शक, निर्माता, दमदार कलावंताची फळी, संगीत या सर्व गोष्टी आवश्यक असताना तिचा पाया नाटकाची ‘संहिता’ असते. ही संहिता मिळवताना, विषयांचे वैविध्य जपताना दिग्दर्शक, निर्मात्यासह तांत्रिक बाजू सांभाळताना नाकीनऊ येते. या पाश्र्वभूमीवर, परिषदेने वेगवेगळ्या एकांकिका तसेच स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणाऱ्या संहिता एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत कार्यकारिणीकडे ४०० हून अधिक संहिता असून त्यांची डिजिटायलेझशन प्रक्रिया सुरू आहे. परिषदेच्या वेब पोर्टलवर या संहिता एका क्लिकवर नाटय़प्रेमींना मिळणार आहे. संहितेसोबत लेखकाचा संपूर्ण तपशील यावर दिला जाईल, जेणेकरून दिग्दर्शक वा निर्मात्याला तांत्रिक अडचणींबाबत थेट लेखकांशी चर्चा करता येईल.
या उपक्रमातून कलावंताची संहितेसाठी होणारी धावपळ कमी होईल, नव्या दमाच्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळेल, ग्रामीण भागातील लेखक थेट मुख्य प्रवाहात येऊ शकतील असा विश्वास नाटय़ परिषदेचे कार्यवाह तसेच ज्येष्ठ अभिनेते दीपक करंजीकर यांनी व्यक्त केला. यासाठी होणारा खर्च नाटय़ परिषद करत आहे.
नाशिक शाखेची स्वतची संहिता बँक असून अन्य ठिकाणीही हा उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे. या शिवाय वेगवेगळ्या स्पर्धेतील संयोजकांशी संपर्क साधत संहिता मिळवण्याचा प्रयत्न
आहे. यावर काम सुरू असून नाटय़ संमेलनानंतर हा उपक्रम रंगकर्मीच्या सेवेत येणार आहे.
रंगकर्मी जोडले जातील
संहिता बँक थेट वेब पोर्टलच्या माध्यमातून खुली होईल. नाटय़ परिषदेच्या सभासदांना स्वतचा युजर आयडी देण्यात आला आहे. ते घरबसल्या भ्रमणध्वनी वा संगणकावर याच्याशी जोडले जातील. शाखेत ही माहिती आहेच. यामुळे अधिकाधिक रंगकर्मी या उपक्रमाशी जोडले जाणार आहेत.
–दीपक करंजीकर (कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद)