अकोला महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. भाजपने ८० पकी तब्बल ४८ जागांवर विजय प्राप्त केला असून काँग्रेसव्यतिरिक्त इतर पक्षांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अकोल्यात भाजपच्या लाटेत इतर पक्षांचा अक्षरश: सफाया झाल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून सगळ्यांचेच अंदाज चुकीचे ठरविले. भाजपने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या वर्षभरापासून जोरदार तयारी केली होती. निवडणुकीची सर्व सूत्र भाजपने खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्याकडे दिली होती. त्यांनी केलेले निवडणुकीचे योग्य नियोजन, सक्षम उमेदवारांची निवड, प्रभावी प्रचार मोहीम व सत्तेत राबविलेल्या विकासकामांच्या भरवशावर भाजपने एकहाती विजय प्राप्त केला. भाजपच्या विजयात खासदार, आमदार व महानगराध्यक्ष यांच्या प्रभावी नेतृत्वाचा सिंहाचा वाटा ठरला आहे. पक्षातील गटबाजी, तिकीट वाटपानंतर झालेली बंडखोरी, पक्षांतर्गत नाराजी या सर्व मुद्दय़ांचा निकालावर कुठलाही प्रभाव पडला नाही. २०१२ मध्ये भाजपच्या १८ जागा होत्या. या निवडणुकीत तब्बल ३० जागांची आणखी भर पडली.
येथे भाजपच्या तुलनेत इतर सर्वच पक्षांची कामगिरी अत्यंत सुमार ठरली. भाजपनंतर दुसरा पक्ष काँग्रेस ठरला आहे. काँग्रेसला १३ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसचे पाच जागांनी नुकसान झाले. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना असून, पक्षाचे आठ उमदेवार निवडून आले आहेत. गेल्या वेळेस एवढेच संख्याबळ आहे. राष्ट्रवादीच्या मोठय़ा अपेक्षांचा फुगा फुटला. राष्ट्रवादीला गेल्यावेळेइतक्याच पाच जागा मिळाल्या.
भारिप प्रभावहीन, एमआयएमचा चंचुप्रवेश
भारिप-बहुजन महासंघही या वेळी प्रभावहीन ठरला. भारिपला केवळ ३ जागांवर विजय मिळवता आला. एमआयएम पक्षाने अकोल्यात चंचूप्रवेश केला असून त्यांचा १ उमेदवार विजयी झाला. अपक्ष म्हणून दोघे निवडून आले.