अकोला : महिला पोलिसाच्या पैशांवर डोळा ठेऊन तिच्याशी लग्न, लग्न झाल्यावर पैसा मिळताच पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ आणि पतीचे पुरुषांसोबत शारीरिक संबंध असल्याचा धक्कादायक प्रकार उघड… एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, असा हा गंभीर प्रकार अकोल्यात समोर आला आहे. शहरातील विवाहित पोलीस महिलेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ झाला. या प्रकरणात पीडित महिलेने पतीवर समलैंगिकतेचादेखील खळबळजनक आरोप केला. या प्रकरणात पतीसह सासरच्या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पोलीस वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.
विवाहित महिलांचा सासरी छळ होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. आता तर चक्क पोलीस महिलेलाच सासरकडील मंडळीकडून छळ सहन करावा लागल्याचा प्रकार शहरात घडला आहे. अकोला पोलीस विभागात कार्यरत महिलेचे २०२२ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात संसार आनंदात सुरू होता. त्यामुळे पोलीस विवाहितादेखील संसारात चांगलीच रमली. त्या पोलीस विवाहितेने सासरकडील घराच्या बांधकामासाठी एक लाख व शेतीवरील कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांतच पतीसह सासरकडच्या मंडळींचा खरा चेहरा समोर आला. विवाहितेसोबत त्यांचा व्यवहार बदलला.
हेही वाचा – यवतमाळचा विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
u
पोलीस महिलेच्या नोकरीवरून तिला सासरी टोमणे मारल्या जाऊ लागले. विवाहितेला मानसिक त्रास दिला जात होता. पतीनेही पैशांसाठी लग्न केल्याचे पीडित विवाहितेला स्पष्टपणे सांगून टाकले. त्यामुळे विवाहित महिलेची पायाखालची जमीनच सरकली. सासरच्या मंडळीकडून पीडितेच्या चारित्र्यावरदेखील संशय घेतला जात होता. एक दिवस आरोपी पतीचा मोबाइल विवाहित महिलेच्या हाती लागला. त्यामध्ये ‘व्हॉटस्ॲप’वरील पतीचे संदेश पीडितेने वाचले. त्यावरून पतीचे समलैंगिक संबंध असल्याचे विवाहितेच्या लक्षात येताच तिला मोठा धक्का बसला. पतीने लग्नाच्या अगोदरपासूनच समलैंगिक संबंध असल्याचे कबूल केले. त्यामुळे त्रस्त पीडिता सासर सोडून आई-वडिलांसह शासकीय निवासात राहण्यासाठी गेली. तरीही पती व सासरकडून मानसिक छळ सुरूच होता. त्यामुळे त्रस्त विवाहितने पोलिसांत धाव घेतली.
हेही वाचा – काय सांगता! शेगावात टक्कल पडण्याची साथ! अचानक केस गळती होऊन…
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर याप्रकरणी पतीसह पाचजणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या ३९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला. पोलीस पुढील तपास करीत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलीस महिलादेखील सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.