महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी दोन छोट्या दंगली उसळल्या. यातली पहिली दंगल अकोल्यात तर दुसरी अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगावात उसळली. अकोला शहरातील हरिहरपेठ भागात रविवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये राडा झाला. या राड्याचं रुपांतर दंगलीत झालं. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच दंगलखोरांनी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनं पेटवली. या घटनेत दोन्ही गटांमधील १० जणांसह दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. अकोला दंगलीवरून आता राज्याचं राजकारण तापू लागल्याचं दिसत आहेत. या दंगलीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सकाळी अकोला दंगलीबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पटोले यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाना पटोले यांनी या दंगलीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पटोले म्हणाले, अकोल्यातील काही तरुण सोशल मीडियावर चॅटिंग करत होते. तेव्हा एका तरुणाने धर्म आणि देवाबद्दल आक्षेपार्ह मेसेज केले. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेत होते. तेव्हा पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या भागात आणखी एक घटना घडली.
नाना पटोले यांनी सांगितलं, “गरीब नवाज असं लिहिलेली ऑटोरिक्षा एक हिंदू तरुण चालवत होता. त्यामुळे त्याला हिंदू तरुणांनीच मारलं. या घटनेची माहिती असतानाही पोलीस तिथे एक तास उशिराने पोहचले. हे सगळं पोलीस प्रशासन घडवत आहेत का? राज्यात हिंदू-मुसलमान दंगल घडवण्याचं षडयंत्र सुरू आहे का? या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी मी स्वतः अकोल्याला जाणार आहे.” दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी याप्रकरणी लक्ष घालावं अशी विनंतीही पटोले यांनी केली आहे.