एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झालेले बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना त्यांच्या घरातूनच मोठा धक्का बसला आहे. कारण, प्रतापराव जाधव यांचे धाकटे बंधू, मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गटनेता संजय जाधव यांनी आपण अजूनही मूळ शिवसेनेतच असल्याचे जाहीर केले आहे. प्रतापराव जाधव यांना बंडखोरीत घरातूनच साथ न मिळाल्याने राजकीय वर्तुळात हा मुद्दा चर्चेचा ठरत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडात बुलढाण्यातून मोठे पाठबळ मिळाले. दोन आमदारांच्या पाठोपाठ प्रतापराव जाधव एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. या बंडामुळे बुलढाणा शिवसेनेत दोन गट पडले आहेत. निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत, तर काही समर्थक बंडखोरांसोबत गेले.
उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख असा उल्लेख –
दरम्यान, खासदार जाधव यांना घरातून विरोध होतांना दिसत आहे. त्यांचे सख्खे धाकटे बंधू संजय जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते उद्धव ठाकरेंच्यासोबत मूळ शिवसेनेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पक्षप्रमुख असा उल्लेखही केला.
मेहकरमध्ये मोठ्या प्रमाणात फलकबाजी –
जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर नेत्यांसोबत त्यांचे छायाचित्र आहेत. मेहकरमध्ये मोठ्या प्रमाणात फलक लावले आहेत. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत असून उद्धव ठाकरे हे माझे नेते असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत त्यांचे बंधूच नसल्याने उलटसुलट चर्चा रंगली आहे. बंडामुळे जिल्ह्यातील खासदार जाधव यांच्या वर्चस्वाला ओहोटी लागल्याचे चित्र आहे.