अकोले पिंपळगावखांड धरणातून अतिरिक्त पाणी सोडू नये या मागणीसाठी आमदार डॉ किरण लहामटे व शेतकऱ्यांनी पिंपळगाखांड धरण स्थळावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पुढील आवर्तनापर्यंत पाणी सोडले जाणार नाही असा शब्द प्रशासन देत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील असे डॉ लहामटे यांनी सांगितले. आवर्तन थांबविले.प्रशासनाने पुन्हा आवर्तन सुरू करू नये या साठी आमदार लहामटे यांनी शेतकऱ्यांसह धरण स्थळावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुळा नदीवर अकोले तालुक्यातील पिंपळगावखांड येथे ६०० दलघफु क्षमतेचा लघुपाटबंधारे तलाव आहे. अकोले व संगमनेर तालुक्यातील १७७८ हेक्टर क्षेत्रास त्याचा लाभ होतो.या धरणास कालवे नाहीत.धरणातून सोडलेले पाणी मुळा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या १८ बंधाऱ्यांमध्ये अडविले जाते व त्याचा उपयोग शेतकरी सिंचनासाठी करतात.

२० फेब्रुवारी पासून पिंपळगावखांड मधून आवर्तन सुरू होते.लाभ क्षेत्रातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील आभाळवाडी बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहचल्यानंतर आवर्तन बंद होणे अपेक्षित होते.कारण लाभक्षेत्राबाहेर पाणी सोडण्यास लाभधारक शेतकऱ्यांचा विरोध आहे.मात्र शेवटच्या टोकाला पाणी पोहचल्यानंतरही आवर्तन बंद न झाल्यामुळे रात्री शेतकऱ्यांनी आवर्तन बंद केले. अधिकाऱ्यांनी सकाळी ते पुन्हा सुरू केले.त्या नंतर आमदार डॉ लहामटे, अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी शेतकऱ्यांसह धरण स्थळी जात चाक बंद करीत पाणी सोडणे थांबविले.

हे आवर्तन पुन्हा सुरू करू नये म्हणून आमदार लहामटे यांनी धरण स्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. धरणाच्या लाभक्षेत्राबाहेर पाणी देण्यास लाभधारक शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे.त्या मुळे आभाळवडी खालील भागासाठी पाणी सोडल्यास उन्हाळ्यात येथील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही.पिके जळतील. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पालकमंत्र्यांच्या दबावाखाली लाभक्षेत्राबाहेरील संगमनेर तालुक्यातील क्षेत्रासाठी पाणी नेण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.त्या मुळे धरणाचे चाक बंद करीत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. जनता रस्त्यावर आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असती. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला असता. जनतेचे रक्षण करणे,त्यांना न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे त्या मुळे आपण आंदोलनात सहभागी झालो असल्याचे डॉ .लहामटे यांनी सांगितले. आपल्याला येथून उचलण्याचा प्रयत्न झाला, पाणी पुन्हा सोडण्याचा प्रयत्न झाला तर ‘अन्नत्याग ‘आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गरज पडल्यास निळवंडे धरणावरही असेच आंदोलन केले जाईल असे त्यांनी बजावले.

निळवंडे च्या कालव्यातून पाणी चाललंय .लोकांच्या जमिनी उपळत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कुणीही यावं अन्याय करावा ही हुकूमशाही अकोल्यात चालवून घेतली जाणार नाही असा इशारा देतानाच आपण राजकारणात आलो ते हुकूमशाही मोडण्यासाठी.२०१९ मध्ये लोकांनी मला निवडून दिले ते येथील हुकूमशाही मोडण्यासाठीच अशी आठवण त्यांनी करून दिली. लोकांच्या हक्कासाठी आपण लढणार.हा लढा पुढे नेणार.आपण आपले दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. गरज पडल्यास विधानसभा अधिवेशनाला जाणे रद्द करू असे त्यांनी सांगितले.

सर्व धरण अकोले तालुक्यात आहेत.नद्या येथे उगम पावतात.भरमसाठ पाऊस पडतो.असे असताना आमच्यावरच अन्याय करणार असाल तर जमणार नाही.अकोल्याचे पाणीच खतरनाक आहे.अकोले काय आहे हे अजून बऱ्याच जणांना माहीत नाही अस्स टोला त्यांनी नाव न घेता पालकमंत्री विखे याना लगावला. दुसऱ्या दिवशीही त्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते.आवर्तन बंद झालेच आहे.पुन्हा सुरू केले तरी पाणी खालील भागात पोहचणे अवघड आहे त्या मुळे पाणी सोडण्याचा अट्टाहास प्रशासनाने करू नये असे त्यांचे म्हणणे आहे.पुढील आवर्तनापर्यंत पाणी सोडले जाणार नाही असा शब्द प्रशासन देत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आमदार लहामटे यांनी ठामपणे सांगितले आहे.

आंदोलनाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते,आवर्तन पुन्हा सुरू करण्याचा अट्टहास सुरूच ठेवणार की शेतकऱ्यांचे म्हणणे मान्य करणार या वर आंदोलन चिघळणार की संपणार हे अवलंबुन आहे.