अकोले : भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्याची चेरापुंजी अशी ओळख असणाऱ्या घाटघर येथे दिवसभराचे बारा तासांत १७० मिमी पाऊस कोसळला. भंडारदरा धरणात पाण्याची मोठया प्रमाणात आवक होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी भंडारदरा धरणातून तसेच निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सायंकाळी निळवंडे धरणातून २२ हजार ५५० क्यूसेक विसर्ग प्रवरा नदी पात्रात सुरू होता.
पावसाच्या पुनरागमनानंतर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असला तरी अकोले तालुक्यातील घाट माथ्यावर विशेष पाऊस नव्हता. मात्र आज सकाळपासून कळसुबाई रतनगडाच्या डोंगर रांगेत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भंडारदरा धरणात होणारी पाण्याची आवक वाढली. धरण पूर्ण संचय पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातून सकाळी साडेअकरा वाजता १६ हजार १६४ क्यूसेक इतका विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात आला. दुपारी त्यात वाढ करून आधी तो १८ हजार ८०८ क्यूसेक तर साडेतीन वाजता हा विसर्ग २३ हजार ८०६ क्यूसेक करण्यात आला.
भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात जमा होते. या शिवाय प्रवरा नदीला भंडारदराचे खालील भागात येऊन मिळणारे ओढे, नाले आणि दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णवंती या प्रवरेच्या उपनदीचे पाणी निळवंडे धरणात जमा होते. निळवंडे धरण ९० टक्के भरले असून या धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निळवंडे धरणातून दुपारी १० हजार ५५० क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी त्यात वाढ करून तो १३ हजार १३० क्यूसेक तर साडेतीन वाजता २१ हजार ७६५ क्यूसेक केला गेला. तर सायंकाळी तो २२ हजार ५५० क्यूसेक पर्यंत वाढविण्यात आला. या मुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू असून संततधार पाऊस व अतिवृष्टी झाल्यास विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. पर्यायाने ओझर बंधाऱ्यावरून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात आज दिवसभर सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. बारा तासांत पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस मिमी मध्ये पुढील प्रमाणे आहे. घाटघर १७०,भंडारदरा १५० पांजरे ८८ रतनवाडी १४०. अकोले तालुक्यात आज सर्वत्र जोरदार पाऊस सुरू होता. आढळा आणि म्हाळुंगी या प्रवरेच्या उपनद्याही दुथडी भरून वाहत आहेत. पणलोटात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर डोंगर कड्यांवरन धबधबे जोमाने कोसळत आहेत. पर्यटकांचे आकर्षण असणारा प्रवरा नदीवरील रंधा धबधबा आवेगाने कोसळू लागला आहे. दुपारनंतर पाणलोटात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता.