सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेत दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वर तलावाकाठी संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा संपन्न झाला. लक्षावधी नेत्रांचे पारणे फेडणाऱ्या या अक्षता सोहळ्यासाठी पांढराशुभ्र बाराबंदीचा पारंपारिक पोशाख परिधान करून आलेल्या भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तब्बल नऊशे वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या श्री सिद्धेश्वर यात्रेत साक्षात त्यांच्या विवाह सोहळ्यावर प्रतिकात्मक विधी पूर्ण केले जातात. श्री सिद्धेश्वर महाराजांची भक्ती करणाऱ्या एका कुंभारकन्येने त्यांच्याशी विवाह करण्याचा हट्ट केला असता सिद्धेश्वर महाराजांनी आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास संमती दिली होती. त्यानुसार कुंभारकन्येचा सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाशी विवाह झाला. यात्रेतील उंच नंदिध्वज हे सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक मानले जातात. मानाचे हे सात नंदिध्वज सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या मालकीचे असले तरी त्यांचा मान विविध जातींना देण्यात आला आहे. पहिल्या नंदिध्वजाचे मानकरी हिरेहब्बू कुटुंबीय तर दुसऱ्या नंदिध्वजाचा मान देशमुखांचा आहे. तिसरा लिंगायत-माळी समाजाचा, चौथा आणि पाचवा विश्वब्राह्मण समाजाचा आणि सहावा आणि सातवा मान मातंग समाजाचा आहे. हे नंदिध्वज सामाजिक समतेचे प्रतीक समजले जातात.

हेही वाचा – मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश का केला? काय आहे राजकीय गणित?

सकाळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून नंदिध्वजांची वाजतगाजत मिरवणूक निघाली. अग्रभागी सनई-चौघडा होता. हलग्यांचे पथक, संगीत ब्रास बँड पथके, नाशिक ढोल, तुतारी अशा विविध वाद्यांनी मिरवणुकीचा मार्ग दुमदुमून गेला होता. मार्गावर लाखो भाविकांनी नंदिध्वजांचे पूजन केले. नंदिध्वजांना नवरदेवाप्रमाणे बाशिंग बांधण्यात आले होते. हा मिरवणूक सोहळा म्हणजे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या प्रतिकात्मक लग्नाच्या वरातीचा सोहळा होता.

तीन किलोमीटर अंतराच्या मिरवणूक मार्गावर ‘संस्कारभारती’च्या कलावंत कार्यकर्त्यांनी रांगोळी रेखाटली होती. यंदा रांगोळीवर अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रभाव दिसून आला. दुपारी सिद्धेश्वर तलावकाठी संमती कट्ट्यावर नंदिध्वज पोहोचले. तेव्हा सिद्धेश्वर महाराजांच्या जयजयकाराने वातावरण दुमदुमून गेले होते. सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते, मिरवणूक समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे आदींनी अक्षता सोहळ्याचे नियोजन केले होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे, तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजय देशमुख, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदी उपस्थित होते. अक्कलकोट संस्थानचे युवराज मालोजीराजे भोसले यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका प्रशासक शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनीही उपस्थिती लावली होती.

हेही वाचा – VIDEO : प्रचंड गर्दीत नुसती घोषणा ऐकून शरद पवारांनी कार्यकर्त्याला ओळखलं; आमदार म्हणाले, “स्मरणशक्तीला सलाम!”

संमती कट्ट्यावर नंदिध्वजांचे आगमन होताच परंपरेप्रमाणे सुगडीपूजन झाले. नंदिध्वजांना हळद लावण्यात आली. नंतर अक्षता सोहळ्यास प्रारंभ झाला. स्वतः सिद्धेश्वर महाराजांनी कन्नड भाषेत रचलेल्या अक्षता सुहास देशमुख यांनी म्हटल्या. मंगलाष्टकांच्या प्रत्येक चरणांवर भाविकांनी नंदिध्वजांच्या दिशेने अक्षतांचा वर्षाव केला, त्यानंतर सिद्धेश्वर महाराजांचा जयजयकार करण्यात आला. अक्षता सोहळ्यानंतर नंदिध्वज पुन्हा ६८ शिवलिंगांना प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्गस्थ झाले.