पाणी समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी २५ लाखांची देणगी, श्रमदानातही सहभाग
चित्रीकरण चालू असलेल्या गावात पाण्याची तीव्र टंचाई असल्याचे लक्षात येताच त्याने ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्याला त्यासाठी कुठे श्रमदान चालल्याचेही समजले, त्याने थेट तिकडे धाव घेतली. ग्रामस्थांशी चर्चा करत या श्रमदानातही सहभाग घेतला. निघताना पुन्हा पुढील कामासाठी तब्बल २५ लाख रुपयांची देणगी देखील जाहीर केली. ..ही सहृदयता आहे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याची! मोठा अभिनेता असूनही समाजातील या समस्यांविषयी त्याला असलेली जाणीव आणि त्यासाठीची त्याची कृती याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
अभिनेता अक्षय कुमार सध्या सातारा जिल्ह्य़ातील पिंपोडे (ता. कोरेगाव) गावी त्याच्या आगामी ‘केसरी’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आला आहे. मागील महिन्यापासून हे चित्रीकरण सुरू आहे. हे चित्रीकरण चालू असताना त्याला गावातील तीव्र पाणीटंचाई विषयी समजले. या समस्येवर मात करण्यासाठी गावात श्रमदान सुरू असल्याचेही त्याला कुणीतरी सांगितले. मग त्याने आपल्या चित्रीकरणातून वेळ काढत श्रमदानस्थळी गुरुवारी भेट दिली. या वेळी गावक ऱ्यांनी त्याचे स्वागत केले. ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने सुरू असलेल्या या कामाची त्याने आस्थेवाईकपणे चौकशी केली. या प्रश्नी त्याला वाटणाऱ्या जाणिवेचे कौतुक होत असतानाच त्याने प्रत्यक्ष या श्रमदानात सहभाग घेतला. काही काळ श्रमदान केल्यावर पिंपोडे गावची पाणी समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी २५ लाखांची देणगी देखील जाहीर केली. अक्षयकुमारच्या या पुढाकाराने पिंपोडेसह परिसरातील नागरिक भारावून गेले.
अक्षयकुमारने या वेळी गावातील ग्रामस्थांशी गप्पा मारल्या. यामध्ये विशेषत: गावातील महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील समस्यांबाबत आपण यापुढेही कृतिशील राहू असे आश्वासन देत त्याने गावकऱ्यांचा निरोप घेतला.
एक एवढा मोठा अभिनेता चित्रीकरणासाठी आलेला असताना त्याच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी फिरतो आणि त्याचे निराकरण करण्यासाठी हातभार देखील लावतो. अक्षय कुमार याच्या या कृतीने सारेच गावकरी सध्या भारावून गेले आहेत. त्याच्या या सहृदयतेचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सातारा माझा आवडता जिल्हा
या वेळी अक्षय कुमार म्हणाला, की सातारा जिल्हा हा मला प्रथमपासूनच खूप आवडतो. इथला निसर्ग, डोंगर हे सारे मला खूप भावते. यामुळे ज्या ज्या वेळी कुठल्या चित्रीकरणाचा विचार सुरू होतो, त्या वेळी मला या जिल्ह्य़ाची सर्वप्रथम आठवण होते. यापूर्वी माझ्या ‘खट्टा-मिठा’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण फलटण येथे झालेले आहे.