Jitendra Awhad on Badlapur Rape Case : बदलापूर येथील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मात्र, या चकमकीला पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला. आता त्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, असा दावा त्यांनी केला आहे. आज मुंबईत संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मागण्याकरता सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ते बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “पोलिसांना बदनाम केलं जातंय. अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी मारली ते अंतर हास्यास्पद आहे. त्याच्या हाताला बेड्या होत्य. मग तो कोणता रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातून काढणार? आता तर हेही सिद्ध झालंय की त्या रिव्हॉल्वरवर अक्षय शिंदेचे ठसेच नाहीत. हे प्रकरण बलात्काराचं असल्याने लोक बोलायला घाबरतात. पण अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही.”
बलात्कार केलेल्यांना सोडवण्याकरता अक्षय शिंदेची हत्या
ते पुढे म्हणाले, “बलात्कार केलेल्यांना सोडवण्याकरता अक्षय शिंदेची हत्या झाली. बलात्कार केलेले कोण होते? जे मी जात वर्चस्ववादाची लढाई म्हणतोय, अक्षय शिंदेची हत्या झाल्यानंतर ते लगेच हजर झाले. यातील सर्वात मोठी गोष्ट असते माणसाची मेमरी शॉर्ट आहे. या एकाच गेमवर सरकार खेळत असतं.”
या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही
“अक्षय शिंदेला जिथे मारलं तो मतदारसंघ माझा आहे. त्याला जिथे मारलं तिथे बाजूला एक चहावाला उभा होता. त्या चहावाल्याने मला फोन करून सगळं व्यवस्थित सांगितलं. इथे काहीतरी झालंय, फायरिंग झाल्याचा आवाज आल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर अक्षय शिंदेचं दुपारपर्यंत प्रकरण समोर आलं. आता प्रश्न हा आहे की अक्षय शिंदेवर ज्याने गोळ्या झाडल्या त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांची चौकशी करा असं न्यायालयाने म्हटलंय. पण पहिल्याच दिवशी कोर्टाने विचारलं होतं की हे कसं काय होऊ शकतं? हायकोर्टाने स्वतःहून याचिका उचलली होती. प्रश्न हा आहे की अजून पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.”
…म्हणून दाऊद दुबईला पळाला होता
“संजय शिंदेंसारखा ज्येष्ठ पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस वॅनमध्ये बसून जातो. आम्ही लहानपणापासून पोलीस पाहतोय किंवा गँगवॉर पाहतोय. मुंबईचे पोलीस काय करू शकतात, हे दाऊदला सर्वात जास्त माहित होतं, म्हणूनच तो दुबईत बसला होता. त्याला माहितेय मुंबईतले पोलीस हेच खरे भाई आहेत, ज्या दिवशी हे ठरवतील त्या दिवसापासून आपलं जिणं मुश्कील होईल. त्यापेक्षा आपण गेलेलं बरं. म्हणून दाऊद दुबईला निघून गेला.