Akshay Shinde Encounter enquiry report Bombay High Cour : बदलापूरमधील चिमुरड्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणीस आले असता न्यायमूर्तींनी या प्रकरणावर महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. या प्रकरणाच्या चौकशी अहवालानुसार या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं न्यायालयाने नोंदवलं आहे. या अहवालानुसार पोलीस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते आणि बळाचा वापर न्याय्य ठरू शकत नाही. त्यामुळे राज्याने या पोलिसांवर गुन्हा नोंदवून कारवाई करणं आवश्यक आहे, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, या सुनावणीनंतर विरोधी पक्ष महायुती सरकार, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरील सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर आपलं मत व्यक्त करत असताना वडेट्टीवारांनी शिंदे-फडणवीसांना धारेवर धरलं आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे! त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजपा संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही, तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करून भाजपाशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची (अपप्रचार) आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे”.

शिंदे फडणवीसांमध्ये एन्काऊंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती : वडेट्टीवार

वडेट्टीवार म्हणाले, “या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. कारण ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘ म्हणून स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे”.

न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने आज (२० जानेवारी) खुल्या न्यायालयात या एन्काउंटर प्रकरणावरील तपास अहवालाचे वाचन केले. “संकलित केलेले साहित्य आणि एफएसएल अहवालानुसार मृताच्या पालकांचे आरोप योग्य आहेत आणि हे पाच पोलीस त्याच्या मृत्यूला जबाबदार आहेत, असं खंडपीठाने म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay shinde encounter enquiry report bombay high court hearing vijay wadettiwar angry on shinde fadnavis govt asc