Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing: बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली असून या सुनावणीवरून न्यायमूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले आहेत. तसंच, अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सदर करण्यास सांगितले आहेत. याप्रकरणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
अक्षय शिंदे याने पोलीस वाहनात पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केला, असा दावा पोलिसांकडून करण्यात येतोय. याबाबत न्यायमूर्तींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली. ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो”, अशा शब्दात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकिलांना आणि पोलिसांना सुनावले.
कोर्टात नेमकं काय घडलं?
न्यायमूर्ती मोहिते डेरे -, मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी केव्हा नेला? त्याचा व्हिडिओग्राफ आहे का? मृत्यूचं नेमकं कारण काय? अक्षयला आणि ऑफिसरला नेमकी कोठे दुखापत झाली?
सरकारी वकील – मृतदेह सकाळी ८ वाजता जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. डोक्यात आरपार गोळी गेली होती. पोलीस अधिकाऱ्यालाही गोळी छेदून गेली.
न्यायमूर्ती चव्हाण – फॉरेन्सिक चाचणी झाली का? ते कोणतं शस्त्र होतं? पिस्तुल लोड झाली होती का? त्याला पिस्तुल लोड करता येत होती का?
सरकारी वकील – झटापटीत ती पिस्तुल लोड झाली.
न्यायमूर्ती चव्हाण – “पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली. ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो.
एवढा निष्काळजीपणा का?
गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला. याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा सवालही न्यायमूर्तींनी विचारला. त्यावर सरकारी वकील वेनेगावकर म्हणाले, त्याच्या हाताला बेड्या होत्या. पण त्याने पाणी मागितलं.
दोन गोळ्या कुठे गेल्या?
अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असं तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता असा परिस्थिती पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं. अशाही प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितलं की, पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली.
अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही?
त्याने जेव्हा हातात पिस्तुल घेऊन कोणावर रोखली तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही. तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणं कठीण आहे. हे एन्काऊंटर असू शकत नाही, असंही न्यायमूर्ती म्हणाले.
जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल द्या
याप्रकरणातील जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे वैद्यकीय अहवालही कोर्टाने मागितले आहेत. तसंच, अक्षयने विशिष्ट अतंराने गोळीबार केला की पाँइट ब्लँक रेंज गोळीबार केला याचा फॉरेन्सिक अहवालही कोर्टाने मागवला आहे. तसंच, एका बाजूला गोळी लागून ती दुसऱ्या बाजूला कुठे गेली असा सवालही त्यांनी विचारला. तसंच, पोलिसांचं वाहन चालवलेल्या ड्रायव्हर, माजी अधिकारी यांचीही चौकशी करण्याचे आणि कॉले डेटा रेकॉर्ड्स तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याने यापूर्वी कधी शस्त्र वापरली आहेत का? जर त्याने पिस्तुल लोड केली असं तुम्ही म्हणत असाल तर त्याने याआधी शस्त्र वापरली असतील, असंही न्यायमूर्तींनी विचारलं. त्यावर सरकारी वकील म्हणाले, त्याने पिस्तुल लोड केली नाही. झटापटीत पिस्तुल लोड झाली होती. त्याने याआधी कधीही शस्त्रे वापरली नाहीत. याप्रकरणी पुढच्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.