Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update : बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच झालेल्या गोळीबाराच्या या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे हे जखमी झाले. दरम्यान याप्रकरणी आता सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभाग तपासणार आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बदलापूर येथील शाळेतील पूर्वप्राथमिक वर्गातील दोन बालिकांवर शाळेच्या स्वच्छतागृहात १२ ऑगस्ट रोजी लैंगिक अत्याचार करण्यात आले. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. मात्र, शाळेत घडलेला प्रकार, तो दडपण्याचे प्रयत्न, पोलिसांची टाळाटाळ या घटनाक्रमामुळे बदलापूरसह राज्यभरात संतापाची लाट उसळली. बदलापूर रेल्वेस्थानकात तीव्र जनआंदोलन करून अक्षय शिंदेला ताबडतोब फाशी देण्याची मागणीही झाली होती. जनक्षोभानंतर राज्य सरकारने प्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ नेमली. या पथकाने तपास करून अक्षय शिंदेवर आरोपपत्रही दाखल केले होते. त्याआधारे अक्षयला लवकरच शिक्षा होण्याची अपेक्षा असताना सोमवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत तो ठार झाला. दरम्यान फोरेन्सिक सायन्सच्या तज्ज्ञांनी आज पोलिसांचं वाहन तपासलं आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

जखमी अवस्थेत अक्षयला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा अक्षयचे आईवडील रुग्णालयात पोहोचले. मात्र त्यांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ‘याप्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी. आमच्या मुलाने साधे फटाके फोडले नाहीत. तो बंदूक कशी खेचू शकतो? शाळा प्रशासनाच्या दबावातून हा प्रकार घडला आहे,’ असा आरोप अक्षयच्या पालकांनी केला.

चकमकीचा घटनाक्रम

●अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्याविरोधात केलेल्या अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अक्षयला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक सोमवारी तळोजा कारागृहात पोहोचले.

●सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पोलिसांच्या वाहनातून नेले जात असताना मुंब्रा बाह्यवळण मार्गावर अक्षयने एका अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

●यातील एक गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या मांडीला लागून ते जखमी झाल्यानंतर प्रत्युत्तरात पोलीस अधिकाऱ्याने अक्षयवर गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी म्हटले आहे.

●ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे समजते. मात्र, पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात त्यांचा उल्लेख नाही.