Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत पोलिसांनी जो स्वरक्षणार्थ गोळीबार केला त्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. हा एन्काऊंटर ( Akshay Shinde Encounter ) हलगर्जीपणामुळे झाला आहे असा आरोप शरद पवारांपासून सगळेच विरोधी पक्षनेते करत आहेत. दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?

अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार ( Akshay Shinde Encounter ) केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत.

हे पण वाचा- Akshay Shinde Encounter : “एन्काऊंटरने न्याय मिळाला असं कुणाला वाटत असेल तर…”, अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर खासदार अमोल कोल्हेंची पोस्ट

अक्षयच्या आई वडिलांनी काय म्हटलं आहे?

“आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. आमच्या मुलाने साधे फटाके फोडले नाही. तो बंदूक खेचून गोळीबार कसा करू शकतो? शाळा प्रशासनाच्या दबावातून हे करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी आमची अक्षय याच्यासोबत तळोजा कारागृहात भेटही झाली होती. आम्ही मृतदेह ( Akshay Shinde Encounter ) ताब्यात घेणार नाही.”

अक्षय शिंदेच्या आईने काय म्हटलं आहे?

अक्षय शिंदेच्या आईने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अक्षयच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “पोलीस आम्हाला काहीच बोलले नाहीत. आम्ही अक्षयला भेटायला तुरुंगात गेले होते तेव्हा त्याने मला विचारले, ‘मम्मी मला केव्हा घेऊन जाणार तुम्ही?’ मी त्याला म्हणाले की, मी वकिलांशी बोलून घेते, आपण एका महिन्यानंतर तुला सोडवू. त्यानंतर मी अक्षयला विचारले की, तुला खायला-प्यायला देतात का? त्यावर अक्षयने, हो मला खायला देतात, असे सांगितल्याचे आईने म्हटले.

अक्षयने मला एक पेपर दाखवला होता

अक्षयची आई म्हणाली, “अक्षयने मला जेलमध्ये एक मोठा पेपर दाखवला. यामध्ये काय आहे वाचून बघ असे तो म्हणाला. पण मला वाचता येत नाही. तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला होता. त्यामध्ये काय लिहलं होतं, माहिती नाही. मात्र, पोलिसांनीच तो पेपर मुद्दाम अक्षयच्या खिशात ठेवला असेल. त्या लोकांनीच मुद्दाम,हा पोरगा असं करुन घेणार, असे कागदावर काहीतरी लिहून, तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा. त्या लोकांना अक्षयला मारायचं होतं, म्हणूनच त्याच्या खिशात ती पावती ठेवली असेल. पोलीस आता खोटं बोलत आहेत. त्यांना कोणीतरी पैसे दिले आहेत”, असा आरोप अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay shinde encounter mother and father serious allegation on police said this thing scj