Akshay Shinde Encounter बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत पोलिसांनी जो स्वरक्षणार्थ गोळीबार केला त्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. हा एन्काऊंटर ( Akshay Shinde Encounter ) हलगर्जीपणामुळे झाला आहे असा आरोप शरद पवारांपासून सगळेच विरोधी पक्षनेते करत आहेत. दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या एन्काऊंटरचा घटनाक्रम कसा होता आपण जाणून घेऊ.
कसा झाला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर?
१) अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्याविरोधात केलेल्या अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अक्षयला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक सोमवारी (२३ सप्टेंबर) तळोजा कारागृहात पोहोचले.
२) सोमवार (२३ सप्टेंबर) संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास पोलिसांच्या वाहनातून नेले जात असताना मुंब्रा बाह्यवळण मार्गावर अक्षयने एका अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
३) या घटनेत एक गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या मांडीला लागून ते जखमी झाल्यानंतर प्रत्युत्तरात पोलीस अधिकाऱ्याने अक्षयवर गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी म्हटले आहे.
४) ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे समजते. मात्र, पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात त्यांचा उल्लेख नाही.
काय आहे हे प्रकरण?
बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ( Akshay Shinde Encounter ) याचा सोमवारी सायंकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. बदलापूरमध्ये ऑगस्ट महिन्यात ही घटना घडली होती. एका प्रतिथयश शाळेतील दोन चिमुरड्यांवर अक्षय शिंदेने ( Akshay Shinde Encounter ) लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. ९ तास रेल रोकोही करण्यात आला होता. बदलापूरच्या रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलनाला एक महिना उलटल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच २३ सप्टेंबरला पोलीस चकमकीत अक्षय शिंदे ठार ( Akshay Shinde Encounter ) झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारवर आणि खासकरुन गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र पोलिसांवर हल्ला केल्याने पोलिसांनी उत्तरादाखल गोळीबार केला त्यात ही घटना घडली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.