सोलापूर जिल्ह्यत ग्रामीण भागातही करोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना बार्शी तालुक्यातील वैराग येथेही एका व्यापाऱ्याला करोनाची बाधा झाल्यामुळे संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्रात आले आहे. परंतु याच चिंताग्रस्त गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी व कर्मचारी चक्क दारूची पार्टी करताना आढळून आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोठय़ा बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या वैराग येथे एका किराणा व भुसार मालाच्या ठोक व्यापाऱ्याला अलिकडेच करोनाची बाधा झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या मंडळींना ताब्यात घेऊ न त्या सर्वाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असून त्याचे अहवाल अजून प्रलंबित आहेत. तर संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्रात आणून कठोर उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली असताना याच गावाचा कारभार जेथून चालतो, त्या ग्रामपंचायत कार्यालयात चक्क दारूची पार्टी होत असताना आढळून आले. ग्रामविकास अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, पाणीपुरवठा अभियंता आणि मुख्य लिपीक असे चौघेही जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कर्तव्य विसरून गाव बंद असल्याचा फायदा घेत दारूची पार्टी केली. ही पार्टी रंगली असतानाच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने संशयावरून तेथे जाऊ न पाहणी केली. तर त्याला धक्का बसला. रंगलेल्या दारू पार्टीचे चित्रीकरण करून समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आले. तेव्हा अखेर वैराग पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह दारूबंदी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. या फौजदारी कारवाईनंतर संबंधितांवर निलंबनाचीही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alcohol party at basthi gram panchayat office abn