गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा दारूमुक्त झोन, अवैध धंदे रोडावले
चलनकल्लोळाचा सर्वाधिक फटका अवैध धंद्यांना बसला आहे. नोटाबंदीचा सकारात्मक परिणाम झाला असून गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा असा दारूमुक्त झोन तयार झालेला आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने हेच स्वप्न बघितले होते, परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात येणार नाही, अशी परिस्थिती असतांनाच नोटाबंदीचा अवैध दारूला सर्वाधिक फटका बसला असून दारूमुक्त झोन तयार झाला आहे.
चंद्रपूर व वर्धा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्य़ात दारूबंदी करतांना गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा, असा दारूमुक्त झोन तयार करण्याची घोषणा केली होती. त्या दृष्टीने त्यांनी पावलही उचलली होती. मात्र, अवैध दारू विक्रेते सातत्याने या तीन जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात दारू पाठवित होते. दारूबंदीनंतर येथे सर्वाधिक दारूविक्री होत होती, परंतु नोटाबंदी जाहीर होताच अवैध दारूविक्रीला चाप बसला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नोटाबंदीमुळे या जिल्ह्य़ात पूर्वीसारखा दारूचा महापूर दिसत नाही. कारण, दारू खरेदी करतांना अगोदरच पैसे द्यावे लागतात. आता देण्यासाठी पैसे नाही आणि बॅंकेतून जुन्या नोटांचे व्यवहार बंद व नव्या नोटा मिळत नसल्याने छत्तीसगड, मध्यप्रदेश, दिव-दमण, नागपूर, आंध्रप्रदेश व तेलंगणातून या जिल्ह्य़ात
होणारा दारूपुरवठा बंद झालेला आहे. हेच नव्हे तर वर्धा जिल्ह्य़ातही दारू तस्करी बरीच कमी झालेली आहे. चलनबंदीमुळे ग्राहकांकडे पैसा नाही, त्यामुळे ग्राहक नसल्याने हा परिणाम झालेला आहे. तसेच परप्रांतातून येणारी अवैध दारूही कमी झालेली आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ातही दारूविक्रीवर सर्वाधिक परिणाम झालेला दिसत आहे. पूर्वी काळीपिवळी टॅक्सी, रेल्वे व इतर मार्गाने गोंदिया, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्रप्रदेशातून अवैघ दारू मोठय़ा प्रमाणात येत होती. आता नोटाबंदीमुळे दारू विक्रेते हातावर हात ठेवून बसलेले आहेत. बडे दारू पुरवठादार नगदी पैसे घेतल्याशिवाय दारू पाठविण्यास तयार नाहीत. परिणामत: सध्या गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा असा दारूमुक्त झोन तयार झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांनी असा झोन तयार करण्यासाठी दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली होती. आता चलनबंदीमुळे आपोआपच दारूमुक्त झोन तयार झाल्याचे चित्र आहे. अर्थात हे चित्र किती दिवस कायम राहते, हे मात्र सांगता येत नाही, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
अंमली पदार्थ तस्करी बंद
या तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये दारूबंदी होताच ब्राऊन शुगर, चरस, गांजा, अफीमसह नशेच्या सिगारेट, गुटका आदी विक्रीचे प्रमाणही बरेच वाढले होते. मात्र, चलनबंदीमुळे त्यावरही मोठा परिणाम झाला असून अंमली पदार्थांची आयात बंदच झाल्यातगत आहे. काही लोक हा व्यवसाय करत असले तरी त्यांच्याही व्यवसायावर गदा आलेली आहे.