येत्या ४८ तासांत कोकणासह गोव्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने आंबा, काजूचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची भीती कृषी तज्ज्ञांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान या बदलत्या हवामानाच्या पाश्र्वभूमीवर कोकण कृषी विद्यापीठाने आंबा, काजू पिकाबाबत अतिदक्षतेचा इशारा बागायतदारांना दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोकणातील ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहोर तसेच फळे करपा रोगाच्या कचाटय़ात सापडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काढणीस तयार झालेल्या फळांनाही फळकुजव्या होण्याची भीती आहे. पावासामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पाऊस पडलेल्या भागामध्ये बागायतदारांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा बागांमध्ये काब्रेन्डिझम १० ग्रॅम अथवा थिओफिनेट मिथिल १० ग्रॅम प्रति दहा लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा तातडीचा सल्ला कोकण कृषी विद्यापीठाने दिला आहे,आंब्याबरोबरच काजूलाही या वातावरणाचा जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या काही भागात काजूबियांची काढणी सुरू आहे, तर काही भागांत अद्यापही बागा मोहोरावर आहेत. ढगाळ वातावरणामुळे काजूचा मोहोर करपण्याची भीती आहे. त्यासाठी मोहोरावर असलेल्या काजूबागांमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति दहा लीटर पाण्यात मिसळून फवारावे, असा सल्लाही कृषी विद्यापीठाने दिला आहे. त्याचप्रमाणे आठवडाभर तापमानात पाच ते सहा सेल्सियसने वाढ झाल्याने आंबा फळे भाजण्याचे आणि गळून पडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आता तर पावसामुळे फळमाशीला पोषक वातावरण निर्माण होऊन या पडलेल्या फळांमध्ये त्यांची वाढ होऊ शकते. म्हणून पडलेली फळे जमा करून तात्काळ एका खड्डय़ात पुरून टाकावीत आणि प्रतिहेक्टरी चार रक्षकसापळे लावावेत. तसेच वाढत्या तापमानाचा फटका कमी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक झाडाला दीडशे ते दोनशे लीटर पाणी द्यावे आणि शंभर ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट (एक टक्का) प्रति दहा लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहनही कोकण कृषी विद्यापीठाने केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा