अलिबाग : अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची तसेच रायगड जिल्हा परिषदेची इमारत अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही इमारतीमधील रहिवाश्यांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करा अशी नोटीस अलिबाग नगर पालिकेने बजावली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक इमारतींना स्थानिक प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अलिबाग नगरपालिकेकडून शहरातील एकूण ४४ धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिध्द केली आहे. ज्यात जिल्हा सामान्य रूग्णालय आणि रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या दोन प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे दोन्ही इमारती अतिधोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या आहेत.
हेही वाचा…“मोदी-शाहांनी अहंकाराच्या सर्व मर्यादा तोडल्या, तुम्ही काय करणार?” संजय राऊतांचा आरएसएसला थेट सवाल
त्यामुळे या इमारतींना महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती, आणि औद्योगिक नगरे अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अलिबाग नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी याबाबतची नोटीस जारी केली आहे. या इमारतीमध्ये वास्तव्य करू नये, इमारतीमधील सर्वांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाचे आता कुठे स्थलांतरीत करायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाच्या इमारतीचे बांधकाम ४० वर्षापूर्वी करण्यात आले आहे. त्यामुळे ही इमारत मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाली आहे. वेळोवेळी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्ची पडले आहेत. मात्र तरीही ही इमारत सुस्थितीत आलेली नाही. सध्या या इमारतीची पुन्हा एकदा दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वारंवार खर्च करूनही इमारत धोकादायक स्थितीत असल्याने ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र बांधकाम विभागाकडून जुन्या इमारतीच्या डागडुजीवर भर दिला जात आहे.
रुग्णालयाच्या इमारतीत शेकडो रुग्णांवर उपचार सुरू असतात. डॉक्टर्स आणि परिचारीका यांच्या सह इतर कर्मचाऱ्यांचा या इमारतीत सतत वावर असतो. अशा परिस्थितीत इमारत दुर्घटनाग्रस्त झाली. तर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रुग्णांचे जीवही धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने इमारत खाली करून नंतर इमारतीची देखभाल दुरुस्ती करून घेण्यास सांगितले आहे. मात्र रुग्णालयासाठी पर्यायी इमारत उपलब्ध नसल्याने धोकादायक इमारतीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुसरीकडे रायगड जिल्हा परिषदेनी त्यांची इमारत यापूर्वीच रिकामी केली आहे. सध्या जुनी दस्तऐवज ठेवण्यासाठी या इमारतीचा वापर केला जात आहे. याशिवाय महत्वाच्या बैठकासाठी इमारतीचा अधून मधून वापर केला जात आहे. त्यामुळे या इमारतीत फारसा वावर नसतो. मात्र तरिही पावसाळ्याच्या चार महिन्यात इतर कारणांसाठी इमारतीचा वापर बंद करण्यास सांगण्यात आले आहे.
नगरपरिषदेने बजावलेल्या नोटीशीनुसार धोकादायक वास्तू, इमारत किंवा संरचना यांची मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनियर यांचेकडून स्ट्रक्चरल ऑडीट करुन घ्यावे. या ऑडीट अहवालानुसार वास्तू, इमारत किंवा संरचना यांची मजबूती दुरुस्ती करुन घ्यावी, तसेच दुरुस्ती शक्य नसल्यास अशा प्रकारच्या भग्नावस्थेतील वास्तूत कोणी ही वास्तव्य करु नये सदर इमारतीमधील रहिवाश्यांनी इतरत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. या उपरही कोणी वास्तव्यास राहिल्यास व त्यामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झाल्यास त्यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे जाहिर आवाहन नगर पालिका प्रशासनाने केले आहे.
नगर पालिकेनी जिल्हा रुग्णालयाची इमारत अतिधोकादायक असेल्याचे जाहीर केले आहे. असे असूनही या इमारतीत धोकादायक परिस्थितीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाने सर्व रुग्णांना सुरक्षीत इमारतीत स्थलांतरीत करावे आणि नंतर इमारतीची दुरूस्ती करावी, अथवा नवी इमारत बांधावी.- संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते.