अलिबाग- अलिबाग परिसरात होणाऱ्या अनिनियंत्रित बांधकाम प्रकल्पांविरोधात अलिबाग मधील रहिवाशी, सामाजिक संस्था एकत्र आल्या आहेत. निसर्गरम्य अलिबागचे मुंबई प्रमाणे काँक्रीटचे जंगल करू नका, येथील निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन करत या परिसराचा विकास करा अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली विद्यासन एज्यूकेशन फाऊंडेशन आणि पिनाकीन पटेल यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, अलिबाग ऑप्टीमिस्ट नावाचे एक संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. ज्यामाध्यमातून अलिबागच्या पर्यावरणपुरक शाश्वत विकासासाठी जन चळवळ उभारली जाणार आहे.

विद्यासन एज्यूकेशन फाऊंडेशन आणि जेष्ठ वास्तुविशारद पिनाकीन पटेल याच्या पुढाकाराने नुकतेच सातीर्जे येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात मांडव्यापासून ते नागाव पर्यंतच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते. या बैठकीत अलिबाग अनियंत्रित बांधकाम प्रकल्प आणि त्यामुळे पायाभूत सुविधांवर वाढलेला ताण यावर चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे अलिबाग ऑप्टीमिस्ट या नावाखाली शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी एक दबावगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अटल सेतू आणि रो रो सेवेमुळे अलिबाग दक्षिणमुंबईच्या जवळ आले आहे. त्यामुळे देशभरातील नामांकीत बांधकाम समुहांनी मोठ मोठे गृहनिर्माण प्रकल्प आणि आलिशान बंगल्याच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. मात्र प्रत्येक जण आपल्या प्रकल्पापुरता विचार करत आहेत. अलिबागच्या एकत्रित विकासाचा दृष्टीकोन त्यांच्यात दिसून येत नाही. त्याचे दुरगामी परिणाम येत्या काळात येथील परिसंस्थेवर तसेच जिवनमानावर दिसून येणार आहेत. व्यापारी नफ्यासाठी येथील जिवनमान धोक्यात आणणे योग्य नसल्याचे मत यावेळी वास्तुविशारद पिनाकीन पटेल यांनी सांगितले.

सासवणे ग्रामपंचायचीच्या अंजली पाटील यावेळी उपस्थित होत्या त्यांनी उंच इमारती आणि टाऊनशीप प्रकल्पांची संख्या बेसुमार वाढली तर पर्यटनावर आधारित अलिबागच्या अर्थव्यवस्थेचे अस्तित्व धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली. जसलोक रुग्णालयाचे डॉ अल्ताफ पटेल यांनीही या अनियंत्रित बांधकाम प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त केली,

सरकार आणि स्थानिकामध्ये संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी वाढत्या नागरिकरणामुळे पाणी प्रश्नाबाबत चिंता व्यक्त केली. पाणी पुरवठ्यासाठी जुन्या तलावांचे पुर्नउज्जीवन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. आक्षी गावचे उपसरपंच आनंद बुरांडे यांनी आधी रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सुविधांचा विकास व्हायला हवा नंतरच टाऊनशीप प्रकल्प यायला हवे असे ते म्हणाले. शासनाला सोबत घेतल्या शिवाय या चळवळीला व्यापक स्वरूप देता येणार नाही असे मत विद्यासन एज्यूकेशन फाऊंडेशनच्या प्राची देशमुख यांनी मांडले. धनश्री खानविलकर यांनी यावेळी संवादकाची भुमिका बजावली.