भू-चुंबकीय क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम अलिबागच्या कुलाबा वेधशाळेत केले जाते. मात्र वेधशाळेच्या दुतर्फा असणाऱ्या रस्त्यांची वर्दळ प्रचंड वाढल्याने भूगर्भातील हालचालींची नोंद करण्यात व्यत्यय येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे नैसर्गिक भू-चुंबकीय नोंदीमध्ये कृत्रिमता येण्यास सुरुवात झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे वेधशाळा परिसरातील वाहनांची वर्दळ कमी करण्याचे आवाहन रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आले आहे.
जगातील प्रमुख भू-चुंबकीय वेधशाळांपैकी एक असणारी ही वेधशाळा अलिबाग शहराच्या मध्यभागात वसलेली आहे. वेधशाळेच्या तीनही बाजूला रस्ते अस्तित्वात आहे. वेधशाळेच्या समोर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता, वेधशाळेच्या डाव्या बाजूला न्यायालयाकडे जाणारा रस्ता आहे; तर उजव्या बाजूला कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलकडे जाणारा रस्ता आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे भू-चुंबकीय घडामोडी नोंदवण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे जगातील प्रमुख भू-चुंबकीय वेधशाळेपैकी एक असणाऱ्या आणि १०० वर्षांचा वारसा असणाऱ्या या वेधशाळेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
त्यामुळे वेधशाळेच्या बाजूला न्यायालयाकडे जाणाऱ्या आणि इंग्लिश मीडियम शाळेच्या बाजूने समुद्राकडे जाणारी वाहतूक कमी करावी, असा अर्ज वेधशाळेने रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तो पोलिसांकडे पाठवला. मात्र दुर्दैवाने याबाबत कुठलीही कारवाई अद्याप झाली नाही.
ब्रिटिश राजवटीत म्हणजे १८२६ साली मुंबईत स्थापन झालेल्या या वेधशाळेला १९०४ साली अलिबागमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. मुंबईत विजेवर चालणाऱ्या ट्राम्समुळे तयार होणाऱ्या इलेक्ट्रिकल नाईजच्या विद्युत चुंबकीय लहरींचा परिणाम वेधशाळेच्या नोंदीवर होऊ लागला होता. याच कारणामुळे ही वेधशाळा अलिबागला स्थलांतरित करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वाहनांची रहदारी वाढल्याने भू-चुंबकीय घडामोडींच्या नोंदी करण्यात कृत्रिमता येण्यास सुरुवात झाली आहे.
नॅनोटेला आणि गॅमा या परिणामात मोजल्या जाणाऱ्या भू-चुंबकीय शक्तींच्या गेल्या १०० वर्षांच्या नोंदी या वेधशाळेत आहेत. दुसऱ्या महायुद्धात जगभरातील वेधशाळा बंद असताना हीच वेधशाळा कार्यरत होती, त्यामुळे या वेधशाळेला महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेधशाळा म्हणूनही या वेधशाळेची ख्याती आहे. त्यामुळे या अनमोल ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
अलिबागची कुलाबा भू-चुंबकीय वेधशाळा अडचणीत
भू-चुंबकीय क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम अलिबागच्या कुलाबा वेधशाळेत केले जाते. मात्र वेधशाळेच्या दुतर्फा असणाऱ्या रस्त्यांची वर्दळ प्रचंड वाढल्याने भूगर्भातील हालचालींची नोंद करण्यात व्यत्यय येण्यास सुरवात झाली आहे.
आणखी वाचा
First published on: 04-04-2013 at 03:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alibags kulaba ground magnetic observatory center in problem