आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांना जीव मुठीत घेऊन उपचार घ्यावे लागत आहेत. आठवड्याभरात स्लॅब कोसळण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. शस्त्रक्रिया. डायलेसीस, क्ष किरण विभागालाही गळती लागली आहे. त्यामुळे जुनी जिर्ण झालेली इमारत पाडून नवीन इमारत बांधावी अशी मागणी केली जात आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आंतरुग्ण विभागाच्या दुरुस्तीसाठी गेल्या काही वर्षात १५ कोटीहून अधिक रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र तरीही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना जीव मुठीत धरून उपचार घ्यावे लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जिल्हा रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. गळतीमुळे स्लॅबचे तुकडे कोसळण्यास सुरवात झाली आहे. शस्त्रक्रिया गृहाला गळती लागल्यामुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंद आहेत. क्ष किरण विभाग, डायलेसिस विभागाची परिस्थिती फारशी वेगळी नाही. त्यामुळे रुग्णालयावर कायमचा उपचार करण्याची वेळ आली आहे.

सर्जिकल वॉर्ड मध्ये छताचा तुकडा कोसळला –

मागील शुक्रवारी महिला प्रसुती कक्षात स्लॅबचा भला मोठा तुकडा कोसळला. यात एक महिला थोडक्यात बचावली. दुसऱ्या एका घटनेत पुरुष सर्जिकल वॉर्ड मध्ये छताचा तुकडा कोसळला होता. आठवडा भरात घडलेल्या या दोन घटनांमुळे रुग्ण भयभीत झाले आहेत. इमारतीच्या बाहेरील भागातून खिडक्यांचे छज्जे कोसळत आहेत. एकूणच रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर इमारत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

२०० ते २५० रुग्णांवर दररोज उपचार केले जातात –

जिल्हा रुग्णालयाची आंतररुग्ण विभागाची इमारत १९८४ साली बांधण्यात आली आहे. दोन मजली या इमारतीत, २०० ते २५० रुग्णांवर दररोज उपचार केले जातात. शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, डायलेसीस, विभाग, आपत्कालीन विभाग, शिशु विभाग, पाकगृह, औषध भंडार, टेलीमेडीसीन केंद्र, क्ष किरण विभाग, शस्त्रक्रीया विभाग या सारखे विभाग कार्यरत आहेत. इमारतीच्या बांधकामाला ३८ वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यामुळे इमारत जीर्ण झाली आहे. इमारत नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सहा ते सात वर्षात या इमारतीच्या देखभालीसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र इमारतीची दुरावस्था थांबलेली नाही. खरे तर येवढ्या खर्चात नवीन इमारत बांधून तयार झाली असती.

इमारतीचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट –

“इमारतीच्या शस्त्रक्रीया गृहाच्या दुरुस्तीचे काम येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण केले जाईल, या शिवाय संपुर्ण इमारतीचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट करून घेतले जाईल. यानंतर इमारतीच्या दुरुस्तीचा अथवा नवीन बांधकामाचा निर्णय घेता येऊ शकेल. अशी माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जगदीश सुखदवे यांनी दिली.

नवीन इमारत बांधणे आवश्यक –

“ इमारतीची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.” अशी माहिती रायगडचे जिल्हा शल्यचिकीत्सक सुहास माने यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alibaug dilapidated condition of inpatient department in district hospita msr