रस्त्यांच्या दुरवस्थेचा पर्यटन व्यवसायाला फटका

रायगड जिल्ह्य़ातील रस्त्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पर्यटकांनी अलिबाग मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. शनिवार- रविवारी पर्यटकांनी गजबजलेले किनारे ओस पडले आहेत.

मुंबई- गोवा महामार्गासह अलिबाग आणि मुरुडला जोडणाऱ्या रस्त्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पेण ते वडखळ, धरमतर ते शाहबाज, तिनविरा ते काल्रेिखड, अलिबाग ते रेवदंडा मार्गावर रस्त्याला भरमसाट खड्डे पडले आहे. खड्डय़ातून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे. वडखळ ते पेण वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी अलिबाग आणि मुरुडकडे पाठ फिरवली आहे.

एरवी पर्यटकांनी शनिवार रविवारी गजबजलेले असणारे अलिबाग, किहीम, आक्षी, नागाव, मांडवा, रेवदंडा, काशिद, नांदगाव आणि मुरुडचे समुद्रकिनारे ओस पडले आहेत. त्यामुळे पर्यटनावर आधारित व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. हॉटेल्स आणि निवास न्याहरी योजना केंद्रे रिकामी आहेत. बुकिंगसाठी चौकशीसाठी येणारे संपर्क बंद झाले आहेत. खराब हवामानामुळे मांडवा ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान चालणारी प्रवासी जलवाहतूक सेवा विस्कळीत आहे. पावसाचा जोर आणि वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाल्यास ही सेवा बंद करण्यात येत आहे. अनिश्चित जलवाहतूक सेवेमुळे गेट वे ऑफ इंडियावरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

अलिबाग तालुक्यात लहान मोठे तीनशे ते चारशे हॉटेल्स आणि लॉजिंग बोर्डिग केंद्र आहेत. मात्र पर्यटक येत नसल्याने त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. चार महिने पर्यटक नसल्याने पर्यटन उद्योगाचे अर्थकारण कोलमडले आहे. रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोवर ही परिस्थिती कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई ते अलिबाग हे अंतर साधारणपणे अडीच ते तीन तासांचे आहे. मात्र रस्ता खराब असल्याने हे अंतर पार करायला पाच ते सहा तास लागत आहेत. त्यामुळे पर्यटक अलिबागला येण्यास तयार नाहीत. याचा विपरीत परिणाम निवास न्याहरी योजना आणि

कृषी पर्यटन व्यवसायावर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यातील पर्यटकांच्या संख्येत ७० टक्क्यांपर्यंत घट दिसून येत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे, असे अलिबाग तालुका कृषी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष अमिष शिरगावकर यांनी सांगितले.

चार महिन्यांपासून फारसे पर्यटक अलिबागमध्ये आलेले नाहीत. यामुळे लहान व्यावसायिकांसमोर आíथक कोंडीचे संकट उभे आहे. अनेकांनी कर्ज काढून पर्यटन व्यवसायात गुंतवणूक केली आहे. पण चार महिन्यांत एखाद दुसरा पर्यटक येत असेल तर कर्जाच्या हप्त्यांची परतफेड कशी करायची, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन देखभाल, कर्मचाऱ्यांचे पगार देणे जिकिरीचे होऊन बसले आहे. असे माय फार्म, पर्यटन व्यावसायिक संचालिका मानसी चेऊलकर यांनी सांगितले.

Story img Loader