स्थानिक शेतकऱ्यांना फायदा; सरकार, कृषी विद्यापीठाचे प्रयत्न
हर्षद कशाळकर, अलिबाग
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात नुकताच एक करार करण्यात आला. वर्षभरात पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पांढऱ्या कांद्यात मोठय़ा प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. विविध व्याधींवर तो गुणकारी आहे.
अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढरा कांदा घेतला जातो. हळूहळू अलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले. पूर्वी तालुक्यात १०० हेक्टरवर याची लागवड होत असे. यंदा अलिबाग तालुक्यात २४५ हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्य़ात खरीप हंगामात भातपिकाची मोठय़ा प्रमाणात लागवड होते. मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिके घेतली जात नाहीत. मात्र अलिबाग तालुक्यात परिस्थिती काहीशी वेगळी असते. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकतो. त्यामुळे शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. सेंद्रिय पद्धतीने पारंपरिक बियाण्यांचा वापर करून ही लागवड केली जाते.
या कांद्याला वाढती मागणी आणि चांगला दर मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत ही लागवड वाढली. दरवर्षी भात कापणीनंतर डिसेंबर महिन्यात या कांद्याची लागवड केली जाते. साधारणपणे अडीच महिन्यांत कांद्याचे पीक येते. स्थानिक महिला विशिष्ट पद्धतीने या कांद्याच्या माळा विणतात आणि नंतर आकारमानानुसार विणलेल्या या पांढऱ्या कांद्याच्या माळा बाजारात येतात. हा कांदा उन्हाळ्यातील दोन ते तीन महिनेच बाजारात मिळतो. याच कालावधीत शेतकरी पुढील वर्षांतील लागवडीसाठी कांद्याचे बियाणे तयार करतात.
शेतकऱ्यांचा प्रतिसाद
पुर्वी पारंपरीक पद्धतीने या पिकाची लागवड केली जात असे. मात्र अलीकडच्या काळात कांदा लागवडीसाठी वाफा आणि मल्चिंग पद्धतीचा वापर केला जाऊ लागला आहे. तसेच शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा वापर टाळून केवळ सेंद्रिय खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. यातून एकरी दोन लाखांपर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचे कृषी विभागाने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.
राज्यात अकोला, धुळे, जगळगाव, अमरावती, नागपूर आणि पालघर तालुक्यातही पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र अलिबागचा कांदा हा चव आणि औषधी गुणधर्मामुळे उजवा ठरतो. या कांद्याला असलेल्या मागणीमुळे अलीकडच्या काळात राज्यात इतरत्र उत्पादित होणारे पांढरे कांदे अलिबागचे कांदे म्हणून विक्री केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
काय परिणाम होणार?
’ भौगोलिक मानांकन अशा उत्पादनांवर वापरले जाणारे चिन्ह आहे, ज्यामध्ये त्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता ही त्याच्या मूळ भौगोलिक स्थानावरून ओळखली जाते. इतर कांदे व अलिबागचा पांढरा कांदा यांच्या गुणधर्मात फरक काय आहे हे जाणून घेण्यासाठी अलिबागमधील पांढऱ्या कांद्याचे भौगोलिक मानांकन करण्याचे कृषी विभागाने ठरवले आहे.
’ मानांकन देण्याची विनंती बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यापीठाने शास्त्रज्ञांची नेमणूकदेखील केली आहे. हे शास्त्रज्ञ पांढऱ्या कांद्याचा अभ्यास करून त्याला मानांकन देतील. त्यातून अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला एक नाव मिळेल व त्याची वेगळी ओळख निर्माण होईल.
’ कार्ले, नेहुली, खंडाळे, सागाव, रुळे, वाडगांव, तळवली या गावांची निवड केली आहे. प्रत्येक गावातील तीन शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शेतात पांढऱ्या कांद्याची लागवड करून त्यावर प्रयोग केले जातील. कोकण कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जितेंद्र कदम तज्ज्ञ म्हणून काम पाहणार आहेत.
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्या दष्टीने कोकण कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि ग्रेट मिशन ग्रुप कन्सलटन्सी यांच्यात झालेला करार हे महत्त्वाचे पाऊल आहे. पुढील वर्षभर या कांद्यावर संशोधन केले जाईल. त्यानंतर या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त होईल, स्थानिक शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.
– पांडुरंग शेळके, कृषी अधीक्षक रायगड