अमरावती : येथील राजापेठ परिसरातील एका खासगी रुग्णालयात जन्मलेले बाळ मरण पावल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. मृत्यूपत्र देखील नातलगांच्या हाती सोपवण्यात आले. मृत जाहीर झालेल्या बाळाला स्मशानभूमीत नेण्यात आले व दफनविधीची तयारी सुरू असतानाच अचानकपणे मृत बाळाच्या शरीरात हालचाल जाणवली. नातेवाईकांनी बाळ जिवंत असल्याचा दावा करून त्याला अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल केले, पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी बाळ मृतच असल्याचा निर्वाळा दिला. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली.

रूपाली सुनील क्षीरसागर (४०, रा. कॉटन मार्केट) या महिलेने प्रसूतीसाठी राजापेठ परिसरातील डॉ. आशीष मशानकर यांच्या रुग्णालयात दाखल होऊन शुक्रवारी पहाटे पाच वाजता मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर प्रसूती असामान्य होण्याची शक्यता वर्तवली होती. प्रसूती सातव्या महिन्यातच झाल्याने बाळाची पूर्ण वाढ झालेली नव्हती. जन्मानंतर लगेच डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तसे मृत्यूवार्तेचे पत्रही भरून देण्यात आले. इकडे बाळ मरण पावल्याचे समजल्यानंतर दु:खी अंत:करणाने नातेवाईकांनी बाळाचा ताबा घेतला व दफन करण्यासाठी बाळाचा मृतदेह येथील स्मशानभूमीत नेला. दफनविधी पूर्ण करणार, एवढय़ात बाळाच्या शरीरात हालचाल जाणवल्याने सारेच जण स्तंभित झाले. नातेवाईकांनी बाळाला लगेच मुधोळकर पेठ परिसरातील ‘होप’ या दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन तासानंतर तेथील डॉक्टरांनीही बाळ मृत असल्याचेच स्पष्ट केले.

या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ‘रिगर मॉर्टिस’ असे म्हटले जाते. अनेकवेळा मृत्यूनंतर सांध्यांना किंवा स्नायूंना तात्पुरता कडकपणा येतो, त्यामुळे शरीरात हालचाल जाणवते, मात्र या बाळात जिवंतपणाचे एकही लक्षण नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Story img Loader