नांदेड: गेल्या वर्षअखेर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि महायुतीला नांदेड जिल्ह्यात शत-प्रतिशत यश मिळाले. पण भाजपाच्या संघटनपर्वात सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानात जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांतील यंत्रणा सदस्य नोंदणी अभियानात पिछाडीवर आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे आमदार व अन्य पदाधिकारी शुक्रवारी नांदेडमध्ये येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड-लातूर-परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांतील निमंत्रित पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची विभागीय बैठक येथील भक्ती लॉन्सच्या परिसरात होत असून या बैठकीच्या आयोजनावर आपल्या भाजपा प्रवेशाची गुरुवारी वर्षपूर्ती करणारे खासदार अशोक चव्हाण आणि त्यांच्या चमूचा प्रभाव दिसून येत आहे.
नांदेड महानगर आणि जिल्ह्यातील १६ तालुके विचारात घेऊन प्रदेश भाजपाने तीन संघटनात्मक जिल्हे निर्माण केले असून प्रत्येक जिल्ह्यातील एका मतदान केंद्रामागे प्रत्येकी २०० सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले होेते. नांदेड जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या विचारात घेता पक्षाने दिलेल्या मुदतीत ६ लाख १७ हजार ६०० सदस्यांची नोंदणी पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु १० फेब्रुवारीपर्यंत तीन संघटनात्मक जिल्ह्यांत मिळून ३ लाख ३७ हजार ७५४ सदस्य नोंदणी झाल्याची माहिती वरील बैठकीच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे.
जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघांच्या हद्दीत सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले; पण नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन मतदारसंघांमधील सदस्य नोंदणीचे चित्र पक्षनेतृत्वाची काळजी वाढविणारे आहे. या दोन मतदारसंघांमध्ये ५० टक्के उद्दिष्टही गाठले गेलेले नाही. नायगाव विधानसभा मतदारसंघात ७० हजार सदस्य नोंदणी अपेक्षित असताना तेथे ८० हजार सदस्यांची नोंदणी झाली. त्या खालोखाल अशोक चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या भोकर मतदारसंघाचा दुसरा क्रमांक असून तेथे १० फेब्रुवारीपर्यंत ५८ हजार सदस्य नोंदले गेले.
किनवट, देगलूर आणि मुखेड या तीनही मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार असून या मतदारसंघांमध्येही उद्दिष्टपूर्ती झाली नाही. पक्षाचे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान यशस्वी व्हावे, यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्र्यांनी मराठवाड्यात लक्ष केंद्रित केले असून गुरुवारी सकाळी ते आधी नांदेडला येणार असून विमानतळावर उतरल्यानंतर थेट बैठकस्थळी जाणार आहेत. नांदेडची विभागीय बैठक आटोपून ते नंतर छत्रपती संभाजीनगरला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील पक्षाच्या सदस्य नोंदणीची मोहीम १० फेब्रुवारीपर्यंत राबविण्याचे आधी निश्चित झाले होते. पण राज्यासाठी निर्धारित केलेल्या (१ कोटी ९७ लाख ३८ हजार ८०० सदस्य) उद्दिष्टाच्या जेमतेम ५० टक्के उद्दिष्ट मुदतीमध्ये साध्य झाले. त्यामुळे पक्षाने आता हे अभियान १९ तारखेपर्यंत लांबविले आहे. पनवेल, कामठी, मीराभाईंदर, कोथरूड आणि बल्लारपूर हे पाच विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक सदस्य नोंदणी अर्ज भरण्याच्या बाबतीत अव्वलस्थानी आहेत तर मालेगाव मध्य, मेहकर, अक्कलकुवा, अर्जुनी मोरगाव आणि मुंबादेवी या पाच मतदारसंघांमध्ये नगण्य सदस्य नोंदणी झाल्याचे पक्षाच्याच अहवालातून समोर आले आहे.
मराठवाडा विभागात भाजपाचे १५ संघटनात्मक जिल्हे असून या विभागातल्या ४६ मतदारसंघांमध्ये १६ हजार ८२६ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रामागे २०० सदस्य या हिशेबाने ३३ लाख ६५ हजार सदस्य नोंदणी पक्षाला अपेक्षित होती; पण १० तारखेपर्यंत मराठवाड्यात १५ लाख सदस्य नोंदणीचा पल्ला गाठण्यात आला होता.