श्रावणी मासातील ऊनपावसाचा खेळ सुरू असून, अचानक कोसळणाऱ्या जोमदार सरींमुळे काही काळाकरिता जनजीवन विस्कळीत होत आहे. कोयना धरण क्षेत्रासह सर्वत्र पावसाने ओढ घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्पात २३२.३२ टीएमसी म्हणजेच ९१.६१ टक्के पाणीसाठा आहे.
कोयना शिवसागरात चालू हंगामातील ७० दिवसांत ८१.१७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गतवर्षी आजअखेर कोयनेत १३२ टीएमसी पाण्याची आवक होताना ६६ टीएमसी पाण्याचा विसर्ग होताना, २५ टक्के जादा पाऊस झाला होता. यंदा गतवर्षीपेक्षा १९ टक्के कमी पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा जादाच असल्याने ठिकठिकाणचे प्रकल्प क्षमतेने भरले आहेत. तर, खरिपालाही हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पात असलेला पाणीसाठा टीएमसीमध्ये तर कंसात त्याची टक्केवारी- कोयना जलसागर ८९.६२ (८५.१४), वारणा ३१.२१ (९१), दूधगंगा २२.३४ (८८), राधानगरी ८.३६ (१००), धोम ११.८९ (८८.०६), कण्हेर ९.५६ (९४.६७), उरमोडी ८.९७ (८९.७५), तारळी ४.८९ (८३.६७), धोम-बलकवडी ३.८१ (९३.११) तर, सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील पुणे जिल्ह्यातील वीर ९.४१ (१००), नीरा देवघर ११.४० (९७.२१), भाटघर २०.८६ (८८.७८).
सध्या धोम, कण्हेर, वारणा, राधानगरी, दूधगंगा या प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जवळपास सर्वच जलसिंचन प्रकल्प शिगोशीग भरले असून, समाधानकारक पाऊस व प्रकल्पातील पाणीसाठय़ांमुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कोयना धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठावरील पावसाची रिपरिप ओसरली असून, श्रावणी ऊनपावसाच्या खेळामुळे आल्हाददायक वातावरण आहे. गेल्या महिनाभरातील समाधानकारक पावसामुळे तळ गाठून असलेली धरणे क्षमतेने भरली आहेत.
आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात १४ एकूण ३,८६४, नवजा विभागात ३८ एकूण ४,७४४ तर, महाबळेश्वर विभागात २९ एकूण ३,६३२ मि.मी. पावसाची नोंद आहे. हा सरासरी पाऊस ४,०८० मि.मी. नोंदला गेला आहे. गतवर्षी कोयनानगर ४,६६४, महाबळेश्वर ५,००५ तर नवजा ५,४६६ मि.मी. सरासरी ५,०४५ मि.मी. पावसाची नोंद होताना, धरणाचा पाणीसाठा ९९ टीएमसी म्हणजेच ९४ टक्के नोंदला गेला होता.
बहुतेक धरणे शिगोशीग; कोयनेचा पाणीसाठा ८५ टक्के
श्रावणी मासातील ऊनपावसाचा खेळ सुरू असून, अचानक कोसळणाऱ्या जोमदार सरींमुळे काही काळाकरिता जनजीवन विस्कळीत होत आहे. कोयना धरण क्षेत्रासह सर्वत्र पावसाने ओढ घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्पात २३२.३२ टीएमसी म्हणजेच ९१.६१ टक्के पाणीसाठा आहे.
First published on: 11-08-2014 at 02:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All dam full koyna 85 percent full