कराड : विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’ला मिळालेले भरभरून यश पाहता सातारा जिल्हा आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हेतर भाजप अन् ‘महायुती’चा बालेकिल्ला झाला आहे. या यशाची पोहोच म्हणून भाजप मित्रपक्षांनी मिळून चार मंत्रिपदे दिली असून, आम्ही सर्वजण मिळून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार आहोत. त्यासाठी यशवंतराव चव्हाणांचे आशीर्वाद व प्रेरणा घेऊन कामाला प्रारंभ करीत असल्याचा विश्वास शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.
राज्याच्या मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे या भाजपच्या सातारा जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी मंगळवारी एकत्रितपणे कराडमध्ये माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, राजेंद्र यादव, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, एकनाथ बागडी, सागर शिवदास, डॉ. सारिका गावडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, पत्रकारांशी शिवेंद्रराजे बोलत होते. यशवंतराव चव्हाणांच्या प्रेरणेने व विचारांवर अभयसिंहराजेंनंतर आम्ही मार्गक्रमण करत असल्याचे शिवेंद्रराजेंनी ठळकपणे नमूद केले. साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाबाबत आपल्या नावाची चर्चा असल्याबाबत ते म्हणाले, पालकमंत्री कोण? यासाठी कोणाच्याही नावाची चर्चा झालेली नसून याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून जिल्ह्यात रस्त्याचे चांगले जाळे उभारण्यासह बांधकाम विभागाची सर्वच कामे दर्जेदारपणे करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
उदयनराजे आणि आपल्यातील वाद संपुष्टात आला का? यावर ते म्हणाले, आम्हा दोघांमध्ये कधीही वाद नव्हता. नगरपालिका निवडणुकीवेळी एका प्रभागात दोन्हीकडील कार्यकर्ते इच्छुक असल्याने काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवले. परंतु, आता असेही वाद होणार नसल्याचा निर्वाळा शिवेंद्रराजेंनी दिला.