पक्षाचे सर्वेसर्वा असल्याच्या थाटात केलेली राजकीय विधाने अंगाशी आल्यानंतर राष्ट्रवादीचे राज्य महासमन्वयक वसंत वाणी यांची सुसाट सुटलेली गाडी रुळावर आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर माध्यमांनीच विपर्यास केल्याचा कांगावा त्यांनी केला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या वाणी यांचे पिंपरी-चिंचवड हेच कार्यक्षेत्र राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातील स्थानिक नेते गेल्या काही वर्षांतील वाणी यांच्या कार्यपद्धतीला चांगलेच वैतागले आहेत, अशी माहिती यानिमित्ताने पुढे आली आहे.
आकुर्डीत ८ मार्चला झालेली पत्रकार परिषद वाणी यांच्या चांगलीच अंगलट आली. विशेषत: २८८ पैकी १४५ जागा लढवण्याचे व स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाण्याचे विधान महागात पडले. शरद पवार यांनी वाणींचा वाढीवपणा गांभीर्याने घेतला. माध्यमांशी अशा पद्धतीने संवाद न साधण्याची तंबी देत ‘ते तुमचे काम नाही’ अशी समजही दिली. वाणी यांनी आपल्यासह पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा न करता मांडलेली निवडणूक ती रणनीती म्हणजे राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका नाही, असे खुद्द शरद पवार यांनीच स्पष्ट केल्याने मुखभंग झालेले वाणी चांगलेच नरमले आहेत.
भाजपमधील अंतर्गत वादातून उचलबांगडी झाल्यानंतर वाणी राष्ट्रवादीत आले. स्वत:च्या पक्षातील नगरसेविकेला काळे फासण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई झाली होती. भाजपमधील पवारांच्या निकटवर्तीयांच्या मध्यस्थीने वाणींनी राष्ट्रवादीची वाट धरली होती. पक्षात आल्यापासून वाणी ‘वरच्या गोतावळ्यात’ राहिल्याने त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे. ‘संघ’ शिस्तीला धरून बैठका, मेळावे, सभांची मांडणी ते राष्ट्रवादीत करू लागले, पक्षयंत्रणा राबवू लागले. साहेब व दादांच्या जवळचा माणूस म्हणून राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये धाक निर्माण झाल्यानंतर स्वत:च्या निकटवर्तीयांची त्यांनी जागोजागी वर्णी लावली. राज्याचा महासमन्वयक अशी बिरुदावली असतानाही िपपरी-चिंचवडचे स्थानिक नेते त्यांना फारशी किंमत देत नव्हते. अजितदादांच्या नावाखाली फर्मान सोडण्याची ‘वसंत’ नीती या नेत्यांना पसंत नव्हती. अशा बहुतांश बैठकांना अजितदादा न फिरकल्याने भांडाफोड झाला. दादांच्या नावाखाली तुमची मनमानी करू नका, असे आझम पानसरे यांनी बजावले होते, तर सांगवीत नाना शितोळेंच्या निवासस्थानी परस्पर समन्वय बैठक लावल्याने शितोळे नाराज झाले होते.
माजी महापौर संजोग वाघेरेंच्या घरी वाणींनी घेतलेल्या समन्वयाच्या बैठकीतच वादावादी झाली होती. विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे या राष्ट्रवादीच्या तीनही आमदारांना वाणींची कार्यपद्धती मान्य नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. वादग्रस्त ठरलेल्या त्या पत्रकार परिषदेत आमदार, महापौर व ज्येष्ठ नेते फिरकले नव्हते. शहराध्यक्ष अनिच्छेने तेथे होते. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, अशी आचारसंहिता असल्याचे वाणींनी या वेळी सांगितले. मात्र त्याच ठिकाणी जिल्ह्य़ातील मोठा पुरवठाधारक तेथे होता व पदाधिकाऱ्यांसाठी जेवणात मांसाहारी पदार्थ आवर्जून समाविष्ट केल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या होत्या
विधानांचा विपर्यास केल्याने
साहेबांचा गैरसमज- वाणी
आपण न केलेल्या विधानांचा विपर्यास केला गेल्याने ‘साहेबां’चा गैरसमज झाला. जे बोललो नाही, ते प्रसिद्ध झाल्याने आपल्याला वेदना झाल्याची भावना वसंत वाणी यांनी व्यक्त केली आहे. ‘स्वबळावर’ शब्द आपण वापरलाच नव्हता. २८८ मतदारसंघात लढण्याची तयारी सुरू असून १४५ जागांवर पक्षाची ताकद चांगली आहे, असा मुद्दा होता. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, असे आपण म्हटले नव्हते. तर अन्य नेतेही पात्र आहेत, असे सांगताना अन्य नेत्यांची नावेही घेतली होती. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, ही राज्यभरातील कार्यकर्त्यांचीच भावना आहे. सकाळी सातपासून रात्री ११ पर्यंत काम करणारा अजितदादांसारखा धडाडीचा नेता आपण अद्याप पाहिला नाही. ते मुख्यमंत्री होण्याइतपत नक्कीच सक्षम व पात्र आहेत, असे व्यक्तिगतरीत्या आपल्याला वाटते. अंतिम निर्णय साहेबच घेतील, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा