वाई : साताऱ्यातील जावळी तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीत सर्व अपक्ष निवडून आले आहेत. गावात उभे राहिलेले प्रतिस्पर्धी दोन्ही पॅनलचे पक्षीय उमेदवार पराभूत झाले. जावळी तालुक्यात भणंग या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीत सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनलमध्ये स्थानिक पातळीवर निवडणूक झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने उतरले होते.
रविवारी ( दि.१६)रोजी मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणीत पक्षांचे स्थानिक पॅनल मधील सर्व उमेदवार पराभूत झाले. सर्व अपक्ष निवडून आले. या ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. गावातील प्रतिस्पर्धी दोन पॅनल मधील सर्व उमेदवार पराभूत झाले, एका स्थानिक पॅनलचे तीन,चार अपक्ष व एक उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावेळी थेट सरपंच निवडणुकीत राष्ट्रवादीचा दीपक पवार यांच्या गटाचा उमेदवार निवडून आला तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या गटाचा एक उमेदवार निवडून आला. सर्व अपक्ष निवडून आल्याने साताऱ्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.हे गाव सातारा महाबळेश्वर रस्त्यावर (ता जावळी) येथे आहे. या गावाची लोकसंख्या दोन हजार असून साडेबाराशे मतदार आहेत.