सिंहस्थानिमित्त झालेल्या पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्यात राज्यातील सत्ताधारी भाजपने अन्य पक्षांना डावलल्याचे आरोप झाले असले तरी महापालिकेतील सत्ताधारी मनसेने आखाडय़ांच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सर्वपक्षीय प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करत वेगळे डावपेच आखले आहेत. यामुळे बुधवारी येथे होणाऱ्या या सोहळ्यास भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून मुख्यमंत्री, मनसे व शिवसेनेचे प्रमुख, काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकाच छताखाली जमणार आहेत. सिंहस्थ विकास कामांच्या श्रेयाच्या लढाईत आपण कुठे कमी पडू नये, यासाठी भाजप व मनसेच्या बरोबरीने राष्ट्रवादीकडूनही दक्षता घेण्यात येत आहे.
श्री गंगा गोदावरी पंचकोठी (पुरोहित) संघातर्फे १४ जुलै आयोजित ध्वजारोहण सोहळ्याद्वारे कुंभमेळ्यास सुरूवात झाली. त्या सोहळ्यावर भाजपने वरचष्मा राखल्याचे आरोप झाले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव स्थानिक नगरसेवकांना व्यासपीठापर्यंत जाण्यास प्रतिबंध केला गेला. त्याचे पडसाद महापालिकेत उमटले होते. त्यावेळी मनसेने आखाडय़ांच्या ध्वजारोहण सोहळ्याची धूरा स्वत:च्या म्हणजे पालिकेच्या खांद्यावर घेत तो दिमाखदारपणे करण्याचे जाहीर केले होते. दरम्यानच्या काळात सुविधा मिळत नसल्यामुळे नाराज साधू-महंतांनी भाजपविरोधात चाललेली आगपाखड लक्षात घेऊन माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्येक आखाडय़ाला भेट देऊन राजकीय इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न केला. या घडामोडी सुरू असताना भाजपने देखील कुठेही मागे न राहण्याचा जणू चंग बांधला आहे.
बुधवारी साधुग्राममध्ये ध्वजारोहण तसेच जगतगुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह स्थानिक खासदार, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. पालिकेतील सर्व नगरसेवकांना प्रमुख पाहुण्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नावर महंत ग्यानदास महाराज यांनी साधू-महंतांचा कोणत्याही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी वा व्यक्तीशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. हा कुंभमेळा असून त्यात जाती, धर्म वा पंथ यांचे बंधन नसल्याचे ते म्हणाले. साधू-महंतांची ही भावना असली तरी राजकीय पक्षांच्या आखाडय़ात कुंभमेळ्यानिमित्त झालेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्यावरून वेगळीच लढाई सुरू असल्याचे दिसत आहे.
कुंभमेळ्यासाठी १२८ अतिरिक्त रेल्वेगाडय़ा
कुंभमेळ्यासाठी भाविकांच्या होणाऱ्या गर्दीचा अंदाज बांधून मध्य रेल्वेने नाशिकरोड व देवळाली येथून औरंगाबाद, अमरावती, दौंड आणि इटारसी या दरम्यान १२८ विनाआरक्षित अतिरिक्त विशेष रेल्वे गाडय़ा चालविल्या जाणार आहेत. शाही पर्वणीच्या काळात या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक पर्वणीला नाशिक येथे ८० लाख तर त्र्यंबकेश्वर येथे ३० लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने खास तजविज केली आहे. मध्य रेल्वे या काळात १२८ विनाआरक्षित रेल्वेगाडय़ा चालविणार आहे. त्यात देवळाली-वर्धा (१६), नाशिकरोड-औरंगाबाद-नाशिकरोड (१६), नाशिकरोड-औरंगाबाद-नाशिकरोड विशेष (२४), नाशिकरोड-दौड-नाशिकरोड (२४), नाशिकरोड-इटारसी-नाशिकरोड (२४), नाशिकरोड-अमरावती-नाशिकरोड (८) अशा अतिरिक्त रेल्वेगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान २९ ऑगस्टला तर दुसरे शाही स्नान १३ सप्टेंबरला होणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पहिल्या दोन्ही शाही स्नानाचे दिवस एकच आहेत. नाशिक येथील तिसरे शाही स्नान १८ सप्टेंबरला तर त्र्यंबकेश्वर येथील २५ सप्टेंबर रोजी आहे. शाही पर्वणीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी उपरोक्त अनारक्षित रेल्वेगाडय़ा चालविणार येणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.