टोल रूपातील राक्षसाची प्रतिकृती, विविध पक्षीयांचे मार्मिक अन् लक्षवेधी झेंडे-फलकांची गर्दी, टोल हटाओच्या गगनभेदी घोषणा, आयआरबी विरोधातील घोषणाबाजी अशा विविध वैशिष्टय़ांनी सामावलेल्या टोल विरोधातील विराट मोर्चाने सोमवारी जनभावनेचा उद्रेक करवीरकरांना पहायला मिळाला. या विराट मोर्चामध्ये हजारो नागरिकांसह रिक्षा, टेम्पो, लक्झरी आदी वाहनांचाही समावेश होता. शहरातील व्यापारी दुकाने बंद करून मोर्चात सहभागी झाल्याने शहरात अघोषित बंदसदृष्य स्थिती पहावयाला मिळाली.शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या सहभागामुळे सहकारी कार्यालये तर विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे शाळा, महाविद्यालये ओस पडली होती. शहरासह जिल्ह्य़ातील नागरिकांनी महामोर्चाला हजेरी लावल्याने शहरातील वाहतूक सायंकाळपर्यंत कोलमडली होती.
आज सकाळपासूनच शहर व ग्रामीण भागातील नागरिक गटागटाने गांधी मैदानाकडे जाताना दिसत होते. अकरा वाजण्याच्या सुमारास गांधी मैदान व परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, आरपीआय, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांचे कार्यकर्ते तसेच प्रमुख नेते सहभागी झाले होते.
आपापल्या पक्षाचा ध्वज कार्यकर्त्यांनी हातात घेतल्याने त्यांचे स्वतंत्र स्वरूप पहायला मिळत होते. वेगवेगळे झेंडे व निरनिराळे फलक मोर्चामध्ये सामावलेले असले तरी त्यातून विविधतेतील एकतेचा प्रत्ययही येत होता. टोलचा फटका वाहतूकदारांना बसणार असल्याने ट्रक, टेम्पो, लक्झरी, रिक्षा आदी वाहतूकदार शेकडो वाहनांसमवेत मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे मोर्चाची रांग लांबच्या लांब पसरली होती. बहुतांशी व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच व्यापारी व्यापार बंद करून आंदोलनात उतरल्याने शहरात बंद सदृश्य परिस्थिती जाणवत होती.
श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज, प्रा.डॉ.एन.डी.पाटील, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार राजू शेट्टी, आमदार महादेवराव महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ.सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा.संजय मंडलिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक,आमदार के.पी.पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी प्रमुखांचा मोर्चामध्ये समावेश होता.
पारंपरिक वाद्यांच्या समवेत आंदोलकांनी टोल विरोधात नृत्याचा ठेका धरला होता. भाजपाचे ज्येष्ठ रामभाऊ चव्हाण यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी ‘देणार नाही, देणार नाही टोल कदापी देणार नाही’ असे गात नृत्याचा ठेका धरल्याने तेथे बघ्यांची गर्दी झाली होती. तर शिवसेनेच्या वतीने टोल रूपातील राक्षसाची काळी कभिन्न प्रतिकृती सर्वाचेच लक्ष वेधून घेत होती. या राक्षसाचा वध करण्यासाठी आमदार क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांनी धनुष्यबाण घेऊन लक्ष्यवेध चालविला होता. हे अभिनव आंदोलन पाहण्यासाठी नागरिक तेथे मोठय़ा संख्येने जमले होते.
गांधी मैदानातून निघालेला मोर्चा महाव्दार रोड, महापालिका, दसरा चौक, बसंत-बहार चित्रमंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे आयआरबी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टोल हटाओच्या विरोधातील घोषणा सातत्याने दिल्या जात होत्या.
विशेष म्हणजे शासकीय अधिकारी व शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांची संघटना असलेली सुटा यांचे सदस्य, व्यापारी आदी प्रतिष्ठित नागरिकही जोरदार घोषणाबाजी करीत होते. शासकीय अधिकारी व कर्मचारी मोर्चात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयातील कामकाज थंडावले होते. महिला, विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा होता. अनेक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली.
टोलविरोधी महामोर्चातून करवीरकरांचा उद्रेक प्रकट
टोल रूपातील राक्षसाची प्रतिकृती, विविध पक्षीयांचे मार्मिक अन् लक्षवेधी झेंडे-फलकांची गर्दी, टोल हटाओच्या गगनभेदी घोषणा, आयआरबी विरोधातील घोषणाबाजी अशा विविध वैशिष्टय़ांनी सामावलेल्या टोल विरोधातील विराट मोर्चाने सोमवारी जनभावनेचा उद्रेक करवीरकरांना पहायला मिळाला. या विराट मोर्चामध्ये हजारो नागरिकांसह रिक्षा, टेम्पो, लक्झरी आदी वाहनांचाही समावेश होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-07-2013 at 07:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All parties organizations civilian participation in mass protest against toll tax in kolhapur