अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मायलेकीचा खून केल्याच्या घटनेला ४ दिवस लोटले, तरी आरोपी पकडण्यात पोलिसांना यश न आल्याने विविध पक्षसंघटनांकडून याबाबत संताप व्यक्त होत आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनीही पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन तपास गतीने करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.
धारूर तालुक्यातील चोरंबा येथे ४ दिवसांपूर्वी अल्पसंख्याक समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मायलेकीचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र, पोलिसांना या घटनेतील आरोपी अजून सापडले नाहीत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर या घटनेकडे राज्यभरातून विविध पक्षसंघटनेच्या नेत्यांचे लक्ष केंद्रित झाले. रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासह जिल्हाभरातील नेत्यांनी भेटी देऊन आरोपींच्या अटकेची मागणी केली. आरोपी सापडत नसल्याने या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. शहरातील किल्ला मदान येथून निघालेला मोर्चा कारंजा, बशीरगंज, शिवाजी चौक नगर रस्ता माग्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी उपस्थित मोच्रेकऱ्यांना औरंगाबाद येथील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, माजी आमदार सय्यद सलीम, उषा दराडे, सभापती संदीप क्षीरसागर यांनी घटनेचा तीव्र निषेध करीत अटकेची मागणी केली. मुफ्ती शेख जावेद, मौलाना जाकेर, मोईन मास्टर, फारूक पटेल, शेख शफिक, इरफान बागवान, अश्फाक इनामदार, जावेद कुरेशी आदींसह नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
घटना नींदनीय- मोहम्मद खान
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी सोमवारी चोरंबा येथे भेट देऊन पीडित शेख कुटुंबीयांचे सांत्वन केले. बीड येथे पत्रकार बठकीत ते म्हणाले, की चोरंबा येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. पोलिसांनी ५ दिवसांत दीडशे लोकांची चौकशी केली. पकी आठ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. गरजेनुसार त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून आरोपी लवकरच निष्पन्न होतील, असा विश्वास खान यांनी व्यक्त केला. मात्र, पोलिसांना यश आले नाहीतर गरज पडल्यास सीबीआय चौकशी करण्यासंदर्भात मागणी करण्यात येईल, असे खान यांनी सांगितले.

Story img Loader