प्रहार पक्षाचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा भाजपाला लक्ष्य केलं आहे. कुणाच्या नेतृत्वात निवडणूक लढायची, कोण मुख्यमंत्री होणार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार आहेत. तर, मग सगळे पक्ष विलीन करून भाजपात जाणं हा चांगला मार्ग आहे, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे. ते बुलढाण्यात ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आणि संधी मिळाल्यास अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, अशी दोन विधान देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेत. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे, हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढत अजित पवारांना मुख्यमंत्री करणार असतील, तर लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढतो, त्यांना मुख्यमंत्री करतात. इथे उलटे होत आहे.”
“अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचं सर्व देवेंद्र फडणवीस हे ठरवणार, हाही मोठा संभ्रम आहे. कुणाच्या नेतृत्वात निवडणूक लढायची, कोण मुख्यमंत्री होणार हेही देवेंद्र फडणवीस ठरवणार. त्यापेक्षा सगळे पक्ष विलीनकरून भाजपात जाणं, हाच चांगला मार्ग आहे,” असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.
हेही वाचा : “फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवार अन् उद्धव ठाकरे…”, भाजपाचा हल्लाबोल
‘बच्चू कडू माझे चांगले मित्र आहेत’, असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. याबद्दल विचारल्यावर बच्चू कडूंनी म्हटलं, “बावनकुळे हे माझे सुद्धा मित्र आहेत. पण, ते माझ्याच मतदारसंघात येऊन मला पाडण्यासाठी रचना करा असं सांगतात. त्यामुळे भेट भगतसिंह आणि राजगुरूसारखी झाली पाहिजे. अफजल खानासारखी होऊ नये.”
‘मुख्यमंत्रीपद गेल्यावर फडणवीसांचे डोळे पाणवले होते,’ अस मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं. यावर प्रश्न विचारल्यानंतर बच्चू कडू म्हणाले, “रवींद्र चव्हाणांना दिसलं असेल. पण, अन्य कुणाला पाणावलेले डोळे दिसले नाहीत. चव्हाणांनी कोणता चष्मा लावलाय हे पाहावं लागेल.”