आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील अनेक उपक्रम गुजरातेत सुरू झाले. आमचे सरकार आल्यास ३ वर्षांत हे सर्व उपक्रम पुन्हा महाराष्ट्रात आणू, असा दावा भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केला.
लातूर शहर मतदारसंघातील भाजप उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचार कार्यालय उद्घाटनानंतर पत्रकार बैठकीत तावडे बोलत होते. ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी कितीही केली जात असली, तरी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळेच केंद्राचे महाराष्ट्रातील अनेक उपक्रम गुजरातेत कार्यान्वित झाले. सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी नारायण राणे हे मोदी सरकारवर आरोप करीत आहेत. महाराष्ट्रात गुंडगिरी नाही, असे पृथ्वीराज चव्हाण सांगतात. लातुरात कल्पना गिरी यांच्या कुटुंबीयांना त्यांनी भेटून असे सांगण्याचे धाडस करावे, असे आव्हानही तावडे यांनी दिले. तावडे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. अॅड. बळवंत जाधव, मोहन माने, शैलेश गोजमगुंडे आदी उपस्थित होते.
‘मुजोर सरकारला धूळ चारा’
राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज करणाऱ्या व १५ वर्षांत ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या मुजोर सरकारला निवडणुकीत धूळ चारा, असे आवाहन तावडे यांनी देवणी येथे केले. निलंगा मतदारसंघातील भाजप उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. निलंगेकर, नागनाथ निडवदे, रामचंद्र तिरुके, गुरुनाथ मगे, डॉ. मन्मथ भातांब्रे, मनोहर पटणे आदी उपस्थित होते. निवडणूक काळातील जाहिरातीत महाराष्ट्रात गुंडगिरी नाही, सर्व जण सुरक्षित आहेत, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. प्रत्यक्षात उस्मानाबादेतील कनगऱ्यात मध्यरात्रीस पोलिसांनी गाव झोडपून काढले. महिलांवर दिवसा बलात्कार होत आहेत. खून, दरोडे रोजचेच झाले आहे. मुख्यमंत्र्यांना धोरण लकवा झाला आहे, हे विधान शरद पवार यांनीच केले. मुख्यमंत्र्यांनी केवळ बिल्डरांच्या फायलींवर सहय़ा केल्याचा आरोप त्यांच्याच सहकाऱ्यांनी केला. अशा भ्रष्टाचारी सरकारला गाडण्याची संधी दवडू नका, असे आवाहनही तावडे यांनी केले.
निलंग्यात काँग्रेसतर्फे अशोक पाटील, तर राष्ट्रवादीतर्फे बसवराज पाटील िरगणात आहेत. दोघांनीही सहकारी साखर कारखाना बंद पाडून भंगारात काढला. जागृती कारखाना नव्याने सुरू झाला. त्यांनी तुमचा ऊस न्यावा, यासाठी कारखान्याचे अध्यक्ष पतिराज यांना भाजपत घेतले. त्यामुळे तुमचा ऊस ‘जागृती’ नाकारणार नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट करीत दिलीपराव देशमुख यांना चिमटा घेतला.

Story img Loader