सावंतवाडी टर्मिनस झाल्यामुळे प्रवाशांना सर्व रेल्वे गाडय़ा थांबतील अशी अपेक्षा होती, पण सध्यातरी पूर्वीच थांबणाऱ्या गाडय़ांना थांबा देण्यात आला आहे. टर्मिनसमुळे मंगला, जनशताब्दी, मत्स्यगंधा, एर्नाकुलम या गाडय़ांना थांबा मिळावा अशी मागणी असूनही कोकण रेल्वेने जादा गाडय़ा आणि सध्या थांबणाऱ्याच गाडय़ांना थांबा दिल्याने टर्मिनसबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावंतवाडी (मळगाव) रोडवर टर्मिनसचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने आवश्यक तेवढे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सध्या थांबणाऱ्या रेल्वे गाडय़ांशिवाय मंगला एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, एर्नाकुलम एक्स्प्रेस गाडय़ा थांबवून या टर्मिनसवर प्रवाशांची गैरसोय दूर केली जाईल अशी अपेक्षा होती, पण कोकण रेल्वेचा तसा विचार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सावंतवाडी टर्मिनसवर कोणकोणत्या रेल्वे गाडय़ा थांबविण्यात येत आहेत, त्याची माहिती कोकण रेल्वेने मुख्य जनसंपर्क अधिकारी सिद्धेश्वर तेलगू यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे टर्मिनसचा फायदा प्रवाशांना कसा होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.

सावंतवाडी टर्मिनसवर थांबणाऱ्या रेल्वे गाडय़ात मांडवी, कोकणकन्या, एलटीसी डेबल डेकर, गांधीधाम-नगरकोइल, कोचुवेली गरीब रथ, त्रिवेंद्रम राजधानी, वास्को-पाटणा, पुणे-एर्नाकुलम, मडगाव-रत्नागिरी, मडगाव-सावंतवाडी प्रवासी गाडय़ा सुटणार आहेत. सावंतवाडी स्टेशनवर प्रतिदिन ९५० पेक्षा जास्त प्रवाशी संख्या लक्षात घेऊन गाडय़ांना थांबा देण्यात येणार आहे.

सावंतवाडीतून प्रवाशांची अतिरिक्त संख्या पाहता उन्हाळा, हिवाळ्यात जादा गाडय़ा सोडण्यात येतील तेव्हा सावंतवाडीला थांबा देण्यात येणार आहे असे मुख्य जनसंपर्क अधिकारी तेलगू यांनी म्हटले आहे. सावंतवाडी टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी ९०५ कोटी मंजूर करण्यात येणार आहेत. प्लॅटफॉर्म, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉटरपोस्ट, टी स्टॉल, डाकघर तथा अतिरिक्त मॉडय़ुलर शेल्टरो आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा दर्जा नामधारीच होता. त्यामुळे टर्मिनसचा आवाज उठविला गेला. आता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे टर्मिनसचा पहिला टप्पा पूर्ण झाला. आता सर्व गाडय़ा थांबविण्याची गरज आहे.

सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, बेळगाव, कोल्हापूर, गोवा राज्याला या ठिकाणी प्रवासी उतरल्यास जवळचा भाग असूनही महत्त्वाच्या गाडय़ांना थांबा देण्याचे टाळले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

 

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All railway not stop at sawantwadi terminus
Show comments