नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित जीवनशाळा व निर्माणशाळेसंदर्भात मागील काही दिवसांपूर्वी आर्थिक गैरव्यवहारासह इतर आरोप करण्यात आले होते. याबाबत समाजवादी शिक्षण हक्क सभेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांची एक टीम प्रत्यक्ष नर्मदा खोऱ्यात पाठवण्यात आली होती. त्यांनी या जीवनशाळांना भेटी देऊन आरोपांच्या दृष्टीने एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात जीवनशाळा तसेच निर्माणशाळेवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा >>> “…अन्यथा तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही,” राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांचे विधान
शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी प्रत्यक्ष पाहणी करून तयार केलेल्या अहवालात वरील सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अभ्यासगटाने १५ ते १८ सप्टेंबर २०२२ या काळात महाराष्ट्रातील शहादा जवळील काही वसाहती व धडगाव तसेच मध्यप्रदेशातील खाऱ्या भादल व बडवानी अशा विविध ठिकाणी जाऊन विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी चर्चा करून सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>>न्यायालयाच्या निर्णयानंतर सुनिल राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “संजय राऊतांनी ठरवलंय की…”
या अभ्यास गटाने जीवनशाळा अस्तित्वातच नव्हत्या, हा आरोप खोटा व खोडसाळपणाचा असल्याचे म्हटले आहे. तसेच आदिवासी भागात करोना संसर्ग नव्हता. त्यामुळे मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून निर्माणशाळेची योजना आकाराला आली. करोना महासाथीमध्ये महाविद्यालयात, शहरात शिकणारे जीवनशाळेचे माजी विद्यार्थी गावात परत आले होते. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या लहान भावंडांना शिकविण्याची जबाबदारी घेतली व निर्माणशाळा सुरु झाल्या. शाळा सुरु व्हाव्यात म्हणून ग्रामपंचायतींनी सभेत ठराव केले आहेत, असे या अहवालात म्हणण्यात आले आहे.
हेही वाचा >>> “उद्धव ठाकरे, भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय…” नारायण राणेंचं नाव घेत भाजपा नेत्याचे मोठे विधान
जीवनशाळांवर केलेले आरोप खोटे आहेत. बदनामी करण्यासाठी हे आरोप केले असावेत. या आरोपात काहीही तथ्य असल्याचे दिसले नाही. या जीवनशाळांनी नर्मदा खोऱ्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
जीवनशाळा, निर्माणशाळेबाबत आरोप काय?
नर्मदा नवनिर्माण अभियानाकडून नर्मदा खोऱ्यातील महाराष्ट्राच्या भागात ६ तर मध्यप्रदेशात १ अशा एकूण ७ जीवनशाळा चालवल्या जातात. या शाळांवर जून महिन्यात काही आरोप करण्यात आले होते. याबाबत एक पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली होती. नर्मदा नवनिर्माण न्यासाने करोनाकाळात सुरू केलेल्या ‘निर्माण शाळा’ अस्तित्वातच नव्हत्या असा दावा करण्यात आला होता. तसेच जीवनशाळा, निर्माणशाळेसाठी जमा झालेल्या १३.५ कोटी रुपयांचा गैरवापर झाला होता, असाही आरोप करण्यात आला होता.