परभणी : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नुकताच येथे ‘शांतता मार्च’ काढण्यात आला होता. शासन, प्रशासन तसेच खासदार राहुल गांधी यांच्यावरही यावेळी त्यांनी टीका केली. ते म्हणाले, सोमनाथच्या घरी राहुल गांधींनी भेट घेतली. एका दलित तरुणाचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात त्यांनी दिशाभूल केली. याउलट सोमनाथ सारख्या वडार समाजातील तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी प्रयत्न केले.

सर्व वंचितांना आंबेडकरवादाच्या दिशेने नेण्याचे आमचे प्रयत्न आणि दलितांच्या नावाखाली राजकारण करण्याचे राहुल गांधी यांचे प्रयत्न यात तफावत आहे असा आरोपही यावेळी सुजात आंबेडकर यांनी केला होता. याच मोर्चात त्यांनी परभणी ते मुंबई या ‘लॉंग मार्च’ संदर्भात वक्तव्य केले होते.

सुजात यांच्या वक्तव्यावर आशिष विजय वाकोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमनाथच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूनंतर व पॅंथर नेते विजय वाकोडे यांच्या निधनानंतर आम्ही प्रमुख मागण्यांसाठी परभणी ते मुंबई लॉंगमार्च काढला होता. नाशिक येथे आम्हाला प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतरही आम्ही मुंबईच्या घाटकोपरपर्यंत ‘लॉंग मार्च’ काढला. आजही काही मागण्या प्रलंबित आहेत. संविधान प्रतिकृतीच्या नासधूस प्रकरणातील आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी अजूनही पूर्ण झाली नाही. यापुढेही जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी आशिष वाकोडे यांनी दिला.

एकूणच सोमनाथ सूर्यवंशी व पॅंथर नेते विजय वाकोडे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी काढण्यात आलेल्या ‘परभणी ते मुंबई’ या लॉंग मार्चच्या अनुषंगाने दोन्ही बाजूंनी आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत.